मुक्तपीठ टीम
आसाम विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम वादाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये निवडणूक अधिकारी कारमध्ये ईव्हीएम घेऊन जाताना दिसत आहेत आणि ही कार भाजप नेत्याची असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर निवडणूक आयोगाने ४ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मात्र, त्यानंतर स्वाभाविकच राजकारण उफाळले आहे.
काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून म्हटले आहे की, अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत आणि निवडणूक आयोगाने यावर कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. आसाममध्ये १ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. ३९ जागांसाठी ७४.६४% मतदान झाले. पहिल्या टप्प्यात येथे ७२.१४% मतदान झाले होते.
Every time there is an election videos of private vehicles caught transporting EVM’s show up. Unsurprisingly they have the following things in common:
1. The vehicles usually belong to BJP candidates or their associates. ….
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 2, 2021
प्रियंका गांधींनी केले भाजपाला लक्ष्य
प्रियंका गांधी म्हणाल्या, “जेव्हा खाजगी वाहनांमध्ये ईव्हीएम आढळतात तेव्हा अशा घटना एकमेव घटना असल्याचे म्हटले जाते आणि त्यांना फेटाळून लावले जाते. व्हिडीओ उघडकीस आणणाऱ्या लोकांना भाजपावाले मीडियाचा वापर करत पराभव होणार असल्याने तसे आरोप केल्याचे सांगतात. खरं तर अशा बर्याच घटना घडत आहेत आणि कोणतीही कारवाई केली जात नाही. आयोगाने पाऊल उचलले पाहिजे. सर्व राष्ट्रीय पक्षांनी ईव्हीएमच्या वापरावर पुनर्विचार करायला हवा. ”
आयोगाच्या गाडीत बिघाड, ईव्हीएम भाजपाच्या गाडीत
पाथरकांडी विधानसभा क्षेत्रातील स्थानिक लोकांनी ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या गाडीला अडवले होते. लोकांचे म्हणणे होते की, ही गाडी निवडणूक आयोगाची नव्हती. निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाल्यामुळे जवळून जाणाऱ्या गाडीला त्यांनी लिफ्ट मागितली होती. ती गाडी एका भाजप उमेदवाराची आहे. भाजपा उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम असल्याचे कळताच जमावाकडून हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. ईव्हीएम मशीन सुरक्षित असून त्यासोबत कोणतीच छेडछाड झाली नसल्याचा दावा एका अधिकाऱ्याने केला आहे.