मुक्तपीठ टीम
राज्यातील विविध कार्यकारी संस्थांच्या गट सचिवांच्या समस्या सोडविण्यासाठी अकोला-वाशिम मॉडेल राबविण्याबाबत अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सभागृहात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील गट सचिवांच्या समस्यांबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, सातारा, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, चंद्रपूर, अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सहकारी संस्थांचे गट सचिव व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, सहकार चळवळीत गट सचिवांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर अकोला-वाशिम जिल्हा कृषी सहकारी पतसंस्था संघ अर्थात ‘अकोला मॉडेल’ राबविण्याबाबत सात सदस्यीय अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभ्यास गटाचा महिन्याभरात अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सहकारी संस्था/सोसायट्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा बाळासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
अकोला मॉडेलबाबत :
अकोला-वाशिम जिल्ह्यांमध्ये विविध कार्यकारी संस्थांवर आणि गट सचिवांवर नियंत्रण रहावे, त्याचे नियमन होऊन शेतकऱ्यांना कर्जपुरवठा व्हावा यासाठी अकोला-वाशिम जिल्हा देखरेख सहकारी संस्था ज्या पद्धतीने काम करत होती त्याच धर्तीवर सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सहकार विभागाचे कामकाज सुलभ पद्धतीने होण्यासाठी जिल्हा कृषी सहकारी पतसंस्थांचा संघ जिल्हा देखेरेख सहकारी संस्थेला सामावून घेऊन निर्माण करण्यात आला. या संघाला सर्वस्तरावरुन मान्यता देण्यात आली. त्यामुळे गट सचिव आणि विकास संस्थांच्या कामकाजावर नियमन व नियंत्रण करणे शक्य झाले. तसेच गट सचिवांचे वेतन नियमित होऊन परिणामी गट सचिवांची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली. यामुळे कामकाजात गतीमानताही आली.