मुक्तपीठ टीम
राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्य सरकारकडून भरीव आर्थिक सहाय्य मिळाल्यास वीज दर कमी केले जाऊ शकतात. यासाठी पुढील पावले उचलली जातील, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.
उद्योगांना वीज दरात सवलत, ओपन ॲक्सेस आदी विषयांवर सह्याद्रि अतिथीगृह येथे उद्योग आणि खनीकर्म मंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव के.वेणूगोपाल रेड्डी, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, इंडियन इलेक्ट्रिसिटी एक्सचेंजचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोहित बजाज आदी उपस्थित होते.
वीज दर कमी करण्याचा संकल्प ऊर्जा विभागाने केला असून यासाठी चालू वर्षासाठी व पुढील चार वर्षासाठी रोड मॅप तयार करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी यावेळी दिली.