मुक्तपीठ टीम
मुळा-मुठा नदीचे प्रदूषण होवू नये यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत जलशुध्दीकरणाचे काम सुरू असून या नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
मुळा-मुठा नदीचे पात्र मोठे असून त्यात जलपर्णी मोठ्या प्रमाणात आहेत. जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा त्रास नागरिकांना होत आहे. जलपर्णीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा याबाबत सदस्य सिध्दार्थ शिरोळे यांनी लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री राहुल कुल, अतुल बेनके, रोहित पवार यांनी सहभाग घेतला
लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवाजीनगर (जि. पुणे) येथे मुळा-मुठा नदीचे पात्र मोठे असून त्यात जलपर्णी मोठ्या प्रमाणात आहेत. जलपर्णीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात येणार आहे. यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत भविष्यकालीन लोकसंख्या विचारात घेवून जलशुध्दीकरण प्रकल्पाची कामे टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येत आहे.जलपर्णीच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जलपर्णी काढण्यासाठी सहा पॅकेजमध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती.पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या नाल्याव्दारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या नदीमध्ये मिसळणारे घरगुती स्वरूपाचे सांडपाणी बंद करून घरगुती सांडपाण्यावर पूर्णपणे प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेकडून मैलापाणी शुध्दीकरण करण्यासाठी रू.९९०.२६ कोटींचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला असून या प्रकल्पांतर्गत १३ पॅकेजेसमध्ये मैलापाणी शुध्दीकरण केंद्रे संवर्धनासाठी विविध कामे करण्यात येणार आहेत. तसेच नदीच्या दोन्ही काठांच्या कडेने मोठ्या व्यासाची मलवाहिनी टाकण्यात येणार असून त्यामध्ये नदीला मिळणाऱ्या नाल्यांमधील मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्पापर्यंत पोहचवून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. जेणेकरून नदीमध्ये येणारे मैलापाणी थोपवणे शक्य होणार आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.