मुक्तपीठ टीम
मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरातील एकूण ६ किल्ल्यांच्या विकासाबरोबरच जतन आणि संवर्धनाचे काम पुरातत्व संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. मुंबईतील सेंट जॉर्ज, शिवडी, वरळी, माहिम, धारावी, आणि वांद्रे या ६ किल्ल्यांच्या विकासाबाबतचा सविस्तर आराखडा यापूर्वी तयार करण्यात आला असून हा आराखडा शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारेही राबविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील किल्ल्यांच्या विकासासंदर्भात ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालक डॉ. तेजस गर्गे, कन्स्ल्टंटचे प्रतिनिधी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख म्हणाले की, राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले हे किल्ले राज्य पुरातत्व संचालनालयाच्या अखत्यारित आहेत. मुंबई आणि मुंबई उपनगरातील ६ किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन पुरातत्व संचालनालयामार्फत करण्यात येणार असून या कामासाठी बाह्यस्त्रोतांचीही मदत घेण्यात येणार आहे. सहा किल्ले मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातले असल्याने या जतन आणि संवर्धन कामामध्ये सांस्कृतिक कार्य विभागाबरोबरच दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पर्यटन विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे या कामासाठी पुरातत्व संचालकांनी पुढाकार घेऊन समन्वयासाठी एक समिती स्थापन करुन यासंदर्भातील कामाचे नियोजन करावे. पुरातत्व संचालक यांनी किल्ले विकासाबाबतच्या आराखड्यामध्ये जिल्हा नियोजन विकास समितीकडून किती निधी मिळेल, पर्यटन विभागाकडून याबाबत काय नियोजन करण्यात येणार आहे याचीही माहिती घ्यावी, असे निर्देशही देशमुख यांनी दिले.
मुंबईतील ६ किल्ल्यांचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्यात येत असून मुंबईतील सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व असल्याने या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच किल्ल्यांच्या ठिकाणी सुविधा निर्माण करणे, किल्ले परिसराचा विकास करणे,या किल्ल्यांवर विद्युतीकरण व प्रकाशझोत योजनेचे काम करण्यावर भर असणार आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा सुध्दा किल्ले जतन, संवर्धनामध्ये समावेश करण्यात यावा अशा सूचना देशमुख यांनी यावेळी दिल्या.
पाहा व्हिडीओ: