मुक्तपीठ टीम
ईडीने चिनी स्मार्टफोन विवो आणि त्याच्याशी संबंधित २३ कंपन्यांवर छापे टाकून ६२ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. भारतातील कर चुकविण्यासाठी चिनी मोबाइल उत्पादक कंपनी ‘विवो’ने बेकायदा रीतीने सुमारे ५० टक्के म्हणजे ६२,७४६ कोटी रुपये चीनला पाठवले, अशी माहिती ईडीने उघड केली आहे. ‘विवो’ने चीनला पाठविलेली रक्कम ही त्यांच्या भारतातील एकूण उलाढालीच्या सुमारे निम्मी आहे. छापे टाकल्यानंतर कंपनीचे संचालक झेंगशेन ओऊ आणि झांग जी देश सोडून पळून गेले आहेत, असा आरोप आहे.
विवो मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या २३ संलग्न कंपन्यांच्या विरोधात बुधवारी सखोल शोध मोहिमेनंतर त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केलेली ४६५ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. याशिवाय ७३ लाख रुपयांची रोकड आणि दोन किलो सोन्याचे बार्सही जप्त करण्यात आले आहेत. ‘लोऊ’ हे विवोचे माजी संचालक आहेत. एप्रिल २०१८मध्ये ते भारतातून गेले. झेंगशेन ओऊ आणि झँग जेई यांनी २०२१मध्ये भारत सोडला.
ईडीच्या कारवाईत कर्मचाऱ्यांनी अडथळा आणला
ईडीने असाही आरोप केला आहे की विवो इंडियाच्या कर्मचार्यांनी शोध मोहिमेदरम्यान सहकार्य केले नाही आणि डिजिटल उपकरणे लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही डिजिटल माहिती मिळवण्यात एजन्सीच्या शोध पथकांना यश आले. विवो पूर्वी, Xiaomi वर देखील कर चुकवेगिरीसाठी कारवाई करण्यात आली होती, ज्यामध्ये भारतात विद्यमान Xiaomi च्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.
या कारवाईवर चिनी दूतावासांकडून संताप व्यक्त!
- छापेमारीनंतर भारतातील चीनच्या दूतावासाने ईडीचा निषेध केला आहे.
- चिनी दूतावासातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय तपास यंत्रणांचा चिनी कंपनीबाबतचा दृष्टिकोन दुर्दैवी आहे.
- चिनी कंपनीला परदेशात व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या जातात, त्यानंतरही अशी कारवाई व्यवसायासाठी योग्य नाही.
- यावर, ईडीने उत्तर दिले की ही कारवाई नियमानुसार करण्यात आली आहे आणि कायद्याचे पूर्णपणे पालन केले जात आहे.