मुक्तपीठ टीम
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ११ जानेवारी २०२२ रोजी एमपीएटीजीएम अर्थात ‘माणसाने वाहून नेता येण्याजोग्या आणि विशिष्ट दिशा असलेल्या रणगाडा-विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वीपणे अंतिम लक्ष्यभेद चाचणी घेतली. संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे हे क्षेपणास्त्र वजनाने हलके, फायर आणि फर्गेट पद्धतीचे क्षेपणास्त्र असून माणसांना वाहून नेता येईल अशा प्रक्षेपकाच्या मदतीने हे क्षेपणास्त्र कार्यरत होते आणि त्यात थर्मल साइट म्हणजे तापमानातील बदलानुसार वस्तू ओळख्नायची यंत्रणा अंतर्भूत आहे. आजच्या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक भेद केला आणि लक्ष्य नष्ट केले. लक्ष्यभेदाचा क्षण कॅमेराने टिपण्यात आला आणि विविक्षित किमान पल्ल्यासाठी ही चाचणी यशस्वी ठरल्याचे जाहीर करण्यात आले.
`
किमान अंतराच्या पल्ल्यासाठी या क्षेपणास्त्राची सातत्यपूर्ण कामगिरी सिध्द करण्यासाठी चाचणी करण्यात आली. या मोहिमेची सर्व उद्दिष्ट्ये पूर्ण झाली. या क्षेपणास्त्रामध्ये लहान आकाराचा इन्फ्रारेड किरणांचा वापर करून वस्तूचा शोध घेऊ शकणारा शोधक तसेच नियंत्रण आणि मार्गदर्शनपर अत्याधुनिक सुविधा बसविण्यात आल्या आहेत. याआधी कमाल अंतराच्या पल्ल्यासाठी घेण्यात आलेल्या चाचण्या देखील या क्षेपणास्त्राने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या क्षेपणास्त्राच्या सातत्यपूर्ण यशस्वी कामगिरीबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण यंत्रणेचा विकास करून आत्मनिर्भर भारताची उभारणी करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तथा डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.जी.सतीश रेड्डी यांनीही चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आहे.