मुक्तपीठ टीम
शाकाहार व व्यसनमुक्ती चळवळीचे प्रणेते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांना पहिला ‘सूर्यदत्त धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वैद्यकीय, शाकाहाराचा प्रसार आणि व्यसनमुक्ती कार्यातील डॉ. गंगवाल यांच्या भरीव योगदान प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून त्यांना या पुरस्कराने सन्मानित करण्यात आले.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या सूर्यदत्त इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडीया यांच्या हस्ते डॉ. गंगवाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष आणि सचिव सुषमा चोरडीया, कार्यकारी संचालक प्रा. सुनील धाडीवाल, अधिष्ठाता डॉ. प्रतिक्षा वाबळे, डॉ. सिमी रेठरेकर यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. गंगवाल यांनी ‘उत्तम आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी’ यावर मार्गदर्शन केले.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “महाराष्ट्रात घरात बनवले जाणारे शाकाहारी जेवण सर्वोत्तम अन्न आहे. हा संतुलित आहार असून, त्यातून शरीराला कार्बोहायड्रेटस, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असे आवश्यक सगळे घटक मिळतात. सूर्यास्ताच्या आधी रात्रीचे जेवण घ्यायला हवे. शाकाहार हा आता जगभरात प्राधान्य दिला जाणारा आहार आहे. आयुष्यात आपले शरीर आणि आरोग्य उत्तम ठेवणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आरोग्य चांगले असेल तर सगळी ध्येय पूर्ण करणे शक्य होते. आनंदी जीवन जगता येते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, व्यसनमुक्त, ताणविरहित जीवन, पर्यावरण संतुलन, अध्यात्माची जोड देणे गरजेचे आहे.
डॉ. संजय चोरडीया यांनी आरोग्याचे महत्त्व सांगताना आपले विद्यार्थी व कर्मचारी यांना उत्तम आरोग्यासाठी स्वत:कडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. सूर्यदत्त परिवाराला सातत्याने मार्गदर्शन करत असल्याबद्दल डॉ. गंगवाल यांचे आभार मानले. पर्यावरण संतुलन आणि सदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन व्यवहारांत सायकलचा वापर करावा, असे आवाहनही डॉ. चोरडीया यांनी यावेळी केले.