Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

उत्सव – वास्तव आणि भ्रम!

September 18, 2022
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
Dr Girish jakhotiya

डॉ. गिरीश जाखोटिया / रविवारीय चिंतन

नमस्कार मित्रांनो ! उत्सवांशिवाय जीवन म्हणजे अळणी जेवण. भारतीय माणसाचे तर सारे जीवनच उत्सवमय असते. आम्ही कोणत्याही उत्सवाची आतुरतेने वाटच पहात असतो. अर्थात प्रत्येकजण आपापल्या धारणेनुसार व ऐपतीप्रमाणे उत्सव साजरा करतो. भारताची खासियत अशी की धर्म, जात, प्रांत आणि भाषेच्या मर्यादा आमचा उत्सवी आनंद कमी करत नाहीत. (हां, सतत रडतखडत जगणाऱ्या कट्टरपंथीयांचा याबाबतीत अपवाद हा असतोच ! ) उत्सवांमध्ये मी रूढी व विधींचाही इथे समावेश करतोय. बहुतेक उत्सवांमागे किमान एखादी रुढी ही असतेच. प्रत्येक विधीचा आम्ही ‘आनंदी उत्सव’ बनवतो आणि बहुतेक उत्सवांना साजरा करण्याचा एखादा विधी हा असतोच. स्थानिक समजांनुसार ( व काही बाबतीत अंधश्रद्धांनुसार !) हे विधी कमीअधिक बदलतात. एक बाब मात्र लक्षात ठेवूयात की जगातील सर्व उत्सव, रूढी व विधी हे मनुष्याने निर्माण केलेले आहेत. काही लोक आपापल्या श्रद्धा (व अंधश्रद्धा) नुसार ‘उत्सवनिर्मिती’च्या बाबतीत भव्यदिव्य, उदात्त व दैवी दावे करीत असतात. वेगवेगळ्या कारणांसाठी स्थलांतर करणारे लोक त्या त्या प्रदेशातील – देशातील उत्सव आनंदाने स्विकारतात व स्वतःच्या पारंपारिक उत्सवांनाही जपतात. जसे की आम्ही मारवाडी जिथे गेलो तिथे भूमीपुत्रांचे सुंदर उत्सव साजरे करू लागलो. स्थलांतरीतांनी काही उत्सवांना तर ‘वैश्विक’ करून टाकले आहे. काही उत्सव तर धार्मिक सीमा ओलांडून लोकप्रिय होतात व यामुळे धर्मापेक्षा स्थानिक संस्कृतीला अधिक महत्त्व प्राप्त होते.

मुळात मनुष्यप्राण्याने जगभरात उत्सवांची, रूढी व विधींची रचना ही सहा कारणांसाठी केली. ही सहा कारणे अशी आहेत – १. मनोकामना (देवाकडचे मागणे) २. मनोबल (दुबळ्या मनाला मानसशास्रीय आधार) ३. मनोमिलन (लोकांशी जोडणे व काही भल्याबुऱ्या कारणांसाठी असा लोकसंग्रह वापरणे) ४. मनोरंजन (व्यक्तीगत, कौटुंबिक व सामुदायिक मनोरंजन करुन घेणे) ५. मनोधारणा (आपल्या अध्यात्मिक व अन्य वांशिक धारणांची अंमलबजावणी करणे) आणि ६. मनोआघात (इतरांनी केलेल्या पारंपारिक सक्तींचे पालन करणे). नंतर जसजसा उत्सवांचा व्याप वाढत गेला तसतसे त्यांचे चांगले व वाईट अर्थकारणही वाढत गेले. काही शहरे, नगरे व खेडी तर फक्त उत्सवांच्या मोसमी अर्थकारणावर जगतात. या शहरांमधून उत्सव हलवले गेले तर कालांतराने ही शहरे ओस पडतील. काही उत्सवांची व रुढींची तर आंतरराष्ट्रीय केंद्रे तयार झाली आहेत जी प्रचंड श्रीमंत आहेत (परंतु यांची प्रजा मात्र गरीबच राहिली आहे !). काही धर्माभिमानी, वंशाभिमानी आणि जात्याभिमानी लोकांनी उत्सव व रुढींमध्ये लबाडीने अंधश्रद्धांची भेसळ केली. अर्थात यात सांस्कृतिक वर्चस्व स्थापण्याचेच कपट होते. ही भेसळ अशी बेमालूमपणे केली गेली की खऱ्यापेक्षा बनावटच चमकत रहावे ! या अंधश्रद्धा अशा पेरल्या गेल्या की यांना साजरा करणाऱ्या भाबड्या लोकांनी सामान्य विवेकही (कॉमनसेंस) वापरू नये. सांस्कृतिक व आर्थिक शोषण, कनिष्ठ जातींची अवहेलना आणि स्रियांबद्दलचा अनादर ही काही विधी व रुढींची अन्यायकारी वैशिष्ट्ये बनली. सामान्य विवेकाच्या व वैज्ञानिक वृत्तीच्या सरसकट अभावामुळे बऱ्याच महिलांना व कनिष्ठ जातींना हा अन्याय म्हणजेच ‘सामान्य जगणे’ वाटू लागले. बरेच अतिप्रगत (?) लोकही परंपरेच्या नावाखाली काही उत्सवांमधील भोंदूगिरीकडे दुर्लक्ष करतात किंवा ती पाळतात.

उत्सवांचे (आणि रूढी व विधींचे) आम्ही प्रामाणिकपणे मूल्यमापन करायला हवे. बदलत्या व जवळ येणाऱ्या या जगात आज तंत्रज्ञानामुळे, संपर्कामुळे आणि वाढलेल्या व्यवहारांमुळे आमची तरुण पिढी ग्रीक, मंगोलियन, अमेरिकन, रोमन, आफ्रिकन व आशियाई इ. उत्सवांची – देवतांची – श्रद्धांची तुलना करू शकते. एकाच उत्सवाचे भारतातील विभीन्न भागांमधील भिन्न – भिन्न प्रयोजन व आयोजन आज भारतीय युवकांना कळलेले आहे. यास्तव उत्सवांचे मूल्यमापन पुढील दहा परिमाणांवर आम्ही सतर्कतेने करायला हवे – १. मानवी मूल्यांचा आधार २. अंधश्रद्धेला थारा नाही. ३. स्थानिक संस्कृती व भूमीपुत्रांचा आदर ४. स्री – पुरुष समानता ५. सामाजिक सुधार व सौहार्दाचा संदेश ६. धार्मिक, जातीय, वांशिक, भाषिक, प्रांतीय भेदाभेद नको ७. निसर्गाची – पर्यावरणाची काळजी घेणारा ८. वैज्ञानिक मान्यता आणि मानसिक – बौद्धिक – शारीरिक आरोग्य प्रदान करणारा ९. योग्य खर्चात, योग्य वेळेत व योग्य ऊर्जेत साजरा होणारा आणि १०. कौटुंबिक – संस्थात्मक – वांशिक मक्तेदारी टाळणारा. ही सारी परिमाणे एकमेकांशी सलग्न आहेत.

उत्सव, रुढी व विधींची आम्ही चिकित्सा करीत नाही कारण आमच्याकडे तेवढा वेळ नसतो, सुयोग्य माहितीचा स्रोत नसतो, आमचे वाचन व चिंतन नसते, जगाकडे खुलेपणाने पहाण्याची वृत्ती व इच्छा नसते, लहानपणापासूनची प्रखर श्रद्धा चिकटलेली असते, व्यावहारिक गरज नसते, आपण ‘अश्रद्ध’ गणले जाऊ ही भिती वाटते, स्वतःच्या उत्सवांचा वा ज्ञानाचा अतिरेकी अभिमान असतो इ.इ. बहुतेक धर्मांमधील आचार्य, मौलवी व फादरना ही चिकित्सा बहुतेकवेळा पसंत नसते. अर्थात याची कारणेही आम्हाला माहीत आहेत. परम्परावाद्यांचे एक नेहमीचे तुणतुणे असते – “हजारो वर्षांपासून चालत आलेली रूढी, विधी किंवा परंपरा ही चुकीची कशी असेल ? तिच्या मागे काहीतरी लॉजिक वा विज्ञानही असणारच. आपल्याच उत्सवांना कमी लेखण्याची हल्ली फॅशन वाढत चाललीय. इतर धर्मांबद्दल बोलण्याचं हे धाडस करत नाहीत.इ.इ.” स्वतःचा अभ्यास कमी असल्याने किंवा अप्रामाणिकपणाच करायचा असल्याने हे हटवादी लोक मुळात चिकित्सेला घाबरतात जी सामाजिक जागरणासाठी अत्यावश्यक असते. हे लोक आपले शेवटचे आयुध बाहेर काढत म्हणतात, “श्रद्धेची चिकित्सा होऊ शकत नाही!”. इथे खरेतर प्रश्न श्रद्धेला दुखावण्याचा नसून परिणाम तपासण्याचा असतो. यासाठी दोन संयुक्तिक उदाहरणे इथे पाहूयात. १. गणेशोत्सव – आम्ही हा विद्येचा उत्सवी सोहळा दहा दिवस साजरा करतो. परंतु संशोधन, नव्या कल्पना, पेटंट्स, कॉपीराईट्स इ. बाबतीत आम्ही काही छोट्या देशांच्याही खूप मागे आहोत. आम्हाला बऱ्याचदा अडचणीचे प्रश्न कुणी विचारलेले आवडत नाहीत. बहुजनांसाठीच्या शिक्षणाबाबत अजूनही प्रचंड काम बाकी आहे. आमची बरीच प्रचंड हुशार मुले आजही उच्च शिक्षणासाठी परदेशी जातात. २. दसरा – हा शक्तीचा सोहळाही आम्ही दहा दिवस साजरा करतो. परंतु स्रियांबद्दलचा आदर, त्यांचे शिक्षण, निर्णयप्रक्रियेतला त्यांचा सहभाग, सांस्कृतिक व धार्मिक रूढींमधली त्यांची पुरुषांच्या तुलनेतली श्रेणी इ. बाबतीत आम्ही आजही बरेच मागासलेले आहोत. आमच्या जन्मापासून ते मरणापर्यंतच्या बहुतेक संस्कारांवर पुरुषी वर्चस्व आहे.

या सर्व गोष्टींचे एकमेव मोठे कारण असे आहे की, कुठल्याही गोष्टीचे आम्ही केलेले उत्सवी उदात्तीकरण व तिचे वास्तव यातील असलेले मोठे अंतर. श्रद्धेच्या हिंदोळ्यावर झुलताना उत्सवातील आम्ही वर्णिलेले व साजरे केलेले पराक्रम आमच्या वास्तवात (आचरणात) नीटपणे उतरत नाहीत हे आम्ही भाबडेपणाने विसरतो किंवा चलाखीने दुर्लक्षितो. भौतिक व बौद्धिक क्षेत्रातील आमच्या अपयशावर, मांद्यावर आणि नैराश्यावर उत्सवी उदात्ततेने आम्ही मात करण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नांच्या अतिरेकातूनच मग बऱ्याच उत्सवांमध्ये मनाला सुखावणाऱ्या कल्पना, अंधश्रद्धा व कथा आम्ही घुसडविल्या. विविध क्षेत्रातील खऱ्या नायकांची, त्यांच्या पराक्रमाची व कष्टांची आठवण आम्ही कमी करतो कारण तसे कष्ट आम्हाला घ्यायचेच नसतात. उत्सव, रुढी, परंपरा आणि विधींच्या आधारे आम्ही दोन पातळ्यांवर समांतरपणे जगत असतो – एक सुखद पण काल्पनिक आणि दुसरी वास्तव पण कष्टप्रद. बहुजनांच्या समस्यांची वास्तव उत्तरे त्यांच्यासमोर न मांडता ‘उत्सवी आनंदा’मध्ये आमच्यापैकी बरेचजण त्यांना गुंतवतो कारण त्यांच्या समस्यांना कायमचे सोडविण्याची आमची इच्छाच नसते. काही राष्ट्रीय उत्सवांमध्ये तर लबाड लोक विविध मेडियांमधून असे दणाणून बोलत असतात की फक्त यांनाच राष्ट्राची काळजी आहे ! भारतीय उपखंडात उत्सवांचा वर्षभर रतीब जो घातला जातो त्या रतीबाचे आम्ही इतके उदात्तीकरण केले आहे की याबाबतीत बोलण्याची कुणाचीही हिंमत होऊ नये. जनसामान्यांची आर्थिक व भौतिक प्रगती पुरेशी करता येत नसल्याने (किंवा तशी इच्छाच नसल्याने) अशा उत्सवी रतीबाचा चलाखीने उपयोग केला जातो.

बऱ्याच उत्सवातील, रुढीतील व विधींमधील प्रक्रिया, प्रतिमा व प्रतिकांना हुशारीने क्लिष्ट केल्यामुळे सामान्यजन त्यांचा सुयोग्य अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. ‘गुरु’ या संकल्पनेबाबत एकूणच आदराची (पूज्यतेची) भावना इतकी प्रचंड बनवून ठेवली गेली आहे की गुरुशी वाद घालणे वा त्यांना प्रश्न विचारणे म्हणजे ‘अश्रद्ध’ ठरण्याचा मोठा धोका ! आर्थिक, बौद्धिक आणि राजकीय अधिकारांचे व सामग्रीचे अधिकांश केंद्रिकरण हे वरीष्ठ जातींकडे झाल्याने जातींच्या पिरॅमिडमध्ये वर चढण्यासाठी बऱ्याच कनिष्ठ जातीतील लोक मोठा प्रयत्न करीत असतात. असा प्रयत्न मग आपसूकपणे वरीष्ठ जातींच्या रुढी, विधी व उत्सवांमधून केला जातो. असे करताना बरेच बहुजन स्वतःचे मूळ उत्तम उत्सव, परंपरा व स्वतःच्या महानायकांना विसरतात. बहुजनांच्या उत्सवांमध्ये कृत्रिमता व आढ्यता नसल्याने ते खूप आनंददायी व नैसर्गिक असतात. आपल्याच निर्मळ जळावरील साचलेला गढूळ थर बहुजनांनी आता दूर करायला हवा. गमतीचा भाग असा की बरेच आचार्य, मौलवी व फादर हे आपापल्या उत्सवांमधील कृत्रिमतेचे, अंधश्रद्धांचे, व आढ्यतेचे समर्थन करताना पूर्ण व योग्य चिकित्सा न केल्या गेलेल्या काही ग्रंथांचा आधार घेत असतात. काही आदरणीय अपवाद सोडल्यास या ‘पुस्तकी स्रोतां’ची छानणी सामान्यजन करत नाहीतच ! यास्तव उत्सवांचा उपयोगी गाभा हा वर चर्चिलेल्या दहा परिमाणांवर तपासला जात नाही. मानवी व सामाजिक आनंदाचा आधार असणारे उत्सव हवेतच, परंतु त्यांची सुयोग्यता ठरविण्याचे तारतम्यही आमच्याकडे असायला हवे !

डॉ. गिरीश जाखोटिया

Girish Jakhotiya

(डॉ. गिरीश जाखोटिया हे उद्योजकीय, वित्तीय व व्यवस्थापन सल्लागार आहेत. तसेच ते ज्येष्ठ लेखक, विचारवंत असून समकालिन घटनांवर ते अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक भाष्य करतात. सध्या मुख्य सल्लागार, जाखोटिया आणि असोसिएट्स, मुंबई – ५७ म्हणून कार्यरत आहेत.)

(महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या “श्रमकल्याण युग” या मासिकात हा लेख नुकताच प्रकाशित झालाय)

Copyright © jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author’s name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.

संपर्क: girishjakhotiya@gmail.com


Tags: CelebritaionDr. Girish JakhotiyaIllusionRealityउत्सवडॉ. गिरीश जाखोटियाभ्रमवास्तव
Previous Post

महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करिअर संधी

Next Post

पत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे

Next Post
Anna Hazare with reporters

पत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु - अण्णा हजारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!