मुक्तपीठ टीम
महात्मा गांधींचे विचार सर्वांसाठी नेहमीच उपयुक्त ठरत आले असून सत्य आणि अहिंसा हे बापूंसाठी केवळ एक तत्वज्ञान नसून जीवनपद्धती होती, असे प्रतिपादन प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि लेखिका डॉ. आमना यांनी केले. इंडियन मुस्लिम फॉर प्रोग्रेस अॅंड रिफॉर्म्सने (इम्पर) गांधी जयंती निमित्त आयोजित केलेल्या वेबिनारवरील व्याख्यानाच्या कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
प्रारंभी गांधी जयंती, लालबहाद्दूर शास्त्री जयंती आणि अंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमीत्त सर्वांना शुभेच्छा देऊन डॉ. आमना म्हणाल्या की, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आसतानाही गांधीजींनी आत्मशक्ती, नैतिकता, अहिंसा, शांतता, सत्य यावरील विश्वास कधी ढळू दिला नाही.
हिंद स्वराज, यंग इंडिया मधील लेख आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅंटोनियो गुटेरेस यांच्या भाषणांचा संदर्भ देत डॉ. आमना यांनी शेवटच्या माणसावर लक्ष केंद्रित करणारे गांधीवादी तत्वज्ञान सविस्तर मांडले.
या वेबिनारचे संचलन सय्यद रिझवान यांनी केले तर खालिद अन्सारी यांनी स्वागत केले.