मुक्तपीठ टीम
पाश्चात्य देशात आपल्या संपत्तीचा मोठा भाग समाजासाठी दान देणं तसं नवं नाही. पाश्चात्य उद्योगपतींची नावं तशा दानशूरपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. भारतातही तो ट्रेंड काही वर्षांपूर्वी सुरु झाला. कायमच दानशूर असणाऱ्या टाटांप्रमाणेच अझिम प्रेमजी यांनीही आपली संपत्ती समाजासाठी दिली. आता उद्योगपती गौतम अदानी यांनीही ६० व्या वाढदिवशी समाजाला असीच महाभेट दिली आहे. ही भेट आहे ६० हजार कोटी रुपयांची!
६० व्या वाढदिवशी ६० हजार कोटी!
उद्योगपती गौतम अदानी २४ जून २०२२ रोजी ६० वर्षांचे झाले. त्यांनी त्यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यासाठी ६० हजार कोटी रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम अदानी फाऊंडेशन आरोग्य सेवा व्यवस्थापन, शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी खर्च करेल.
On our father’s 100thbirth anniversary & my 60thbirthday, Adani Family is gratified to commit Rs 60,000 cr in charity towards healthcare, edu & skill-dev across India. Contribution to help build an equitable, future-ready India. @AdaniFoundation pic.twitter.com/7elayv3Cvk
— Gautam Adani (@gautam_adani) June 23, 2022
भारतातील सर्वात मोठं कॉर्पोरेट दान!
- गौतम अदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या देणगीद्वारे समूहाने त्यांचे वडील शांतीलाल अदानी यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सन्मानित केले आहे.
- भारतीय कॉर्पोरेट विश्वातील फाउंडेशनमध्ये ही हस्तांतरित करण्यात आलेली देणगी सर्वात मोठी रक्कम आहे, असे ते म्हणाले.
भारतातील सर्वात मोठे देणगीदार
- विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी हे भारतातील सर्वात मोठे देणगीदार म्हणून ओळखले जातात, ज्यांनी आतापर्यंत सुमारे २१ बिलियन डॉलर दान केले आहे.
- अझीम प्रेमजी यांनी २०२०-२१ मध्ये ९ हजार ७१३ कोटी रुपयांची देणगी दिली.
- दररोज आपल्या कमाईतील २७ कोटी रुपये देणगी देणाऱ्या प्रेमजींनी कोरोना महामारीच्या काळात लसीकरणाच्या कामांसाठी देणगीची रक्कम दुप्पट केली होती.
दानशूर अब्जाधीशांच्या ग्लोबल यादीत आता गौतम अदानीही!
- गौतम अदानी यांनी २०२२मध्ये आतापर्यंत त्यांच्या संपत्तीमध्ये १५ बिलियन डॉलर कमवले आहेत, जी या वर्षातील जगातील सर्वाधिक आहे.
- गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ९२ अब्ज डॉलर आहे.
- आता त्यांचं नाव मार्क झुकरबर्ग आणि वॉरेन बफे यांसारख्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत जोडले जाईल, ज्यांनी आपली मोठी कमाई सामाजिक कारणांसाठी दान केली आहे.