मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून सावरण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत बेरोजगार युवकांना स्वत:च्या व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने अथक प्रयत्नातून फिरत्या विक्री केंद्रासाठी वाहन वाटपाचे हे उद्दिष्ट साकार झाले आहे. अथक परिश्रम व खडतर मेहनतीतूनच यशस्वी उद्योजक घडत असतो, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
येवला संपर्क कार्यालय येथे आयोजित मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सौजन्याने बेरोजरागारांना फिरते विक्री केंद्राचे वाहन वाटप करण्यात आले त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रादेशिक व्यवस्थापक भगवान सुरसे, मुख्य प्रबंधक मनिष कुमार गुप्ता, शाखा प्रबंधक मोहम्मद साबिर,समन्वयक सचिन पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ही योजना अमलात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा होईल यादृष्टीने नियमात बसवून योजना अमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून ६ लाख ते १० लाखांपर्यंत किंमतीचे मालवाहतुकीसाठी वाहन उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्याला वाहनाच्या किंमतीच्या ५ टक्के रक्कम सुरवातीला भरावी लागते. यावर शासनाची १५ टक्केपासून ३५ टक्केपर्यंत सबसिडी मिळते. व कर्जाच्या रकमेची ५ वर्षात परतफेड सुलभ हप्त्याने करता येते. या योजनेचा जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.
याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात आनंदा दुनबळे, वेता बोथरा, पुजा जाधव, बळीराम जाधव, दत्तात्रय पगारे, सुरेश गोरडे, कुणाल वाकचौरे, योगेश वाघ, रोहिनी महानुभाव, काशिनाथ खळे, सविता लासुरे, निलेश वाकळे, सरला रोकडे, मेघाली खरात, राकेश जगताप व सायली जमादार या १६ लाभार्थ्यांना मालवाहतुक वाहनांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. तर २५ लाभार्थ्यांना वाहन मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले.