मुक्तपीठ टीम
जळगावातील मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद अजूनही सुरुच आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे त्रास देत असल्याचा आरोप शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर, सामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती आमदार झाल्याने एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त झाले. याशिवाय, ३५ वर्षांपासून मुक्ताईनगर मतदारसंघात विकास खुंटल्याची टीकाही शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
एकनाथ खडसे टार्गेट करुन त्रास देत आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकला जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला. पुढे मुक्ताई मंदिरातील ५ कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण झाला. त्यामुळे खडसेंनी पाटलांना प्रतिउत्तर देत म्हटलं की, “मुक्ताईनगर, संत मुक्ताई मंदिर परिसराच्या विकासासाठी निधीला स्थगिती देण्याचा करंटेपणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाठपुरावा केल्याचे एक तरी पत्र दाखवावे. आमदार खोटारडे आहेत, करंटे आहेत.”
आता आमदार पाटील ठाकरे-पवारांकडे तक्रार करणार!
- एकनाथ खडसे विधानसभा गमावल्यापासून वैफल्यग्रस्त आहेत.
- ते त्या रागातून निवडून आलेल्या चंद्रकांत पाटील यांना सतत त्रास देत आहेत.
- त्यामुळे आता सर्व वस्तुस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगणार असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
- एकनाथ खडसे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकत असल्याचा असा आरोपही त्यांनी केला.