मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे खळबळ माजवणाऱ्या महिलेने अखेर तिची तक्रार मागे घेतली आहे. माध्यमांमध्ये मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने तशा बातम्या देण्यात आल्या आहेत. १५ जानेवारीला तक्रारदार महिलेने तीन ट्विट केले होते. तिच्या ट्वीटमधून तिने आता माघारीचे संकेत दिल्याचे मानले जात असल्याची बातमी www.muktpeeth.com ने दिली होती.
मुंडेंविरोधातील तक्रारदार महिलेचे ट्वीट, “चुकीचे आरोप होत असतील तर मीच माघार घेते”
तेव्हा तिचे ते तीन ट्वीट चर्चेचा विषय ठरले होते. आता पोलिसांकडे तिने केलेली तक्रार मागे घेतल्याच्या बातम्यांमुळे मुंडेंना दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील व्यवसायाने गायिका असणाऱ्या या महिलेने धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केल्याने राजकारणात खळबळ माजली होती. मुंडेंनी या प्रकरणाविषयी स्पष्टीकरण देताना केलेले निवेदन आणखी वाद निर्माण करणारे ठरले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मुंडेंविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. मात्र, पूर्वी काँग्रेसचे आमदार असणारे विद्यमान स्थानिक भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी मुंडेंविरोधात आरोप करणारी महिला ही त्यांनाही ब्लॅकमेल करत होती, अशी तक्रार आंबोली पोलीस ठाण्यात नोंदवल्याने चित्र बदलू लागले.
वाचा संबंधित बातमी:
धनंजय मुंडेंना भाजप नेत्याकडून मोठा दिलासा! ‘ती’ महिला ‘हनीट्रॅप’वाली असल्याचा आरोप!!
हेगडेंमागोमाग मनसेचे अंधेरीतील नेते मनिष धुरी यांनीही सदर महिलेने त्यांनाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या दोन नेत्यांशिवाय जेट एअरवेजच्या माजी अधिकाऱ्यानेदेखील महिलेबाबत अशीच तक्रार नोंदवली आहे.
त्यांच्यामागोमाग मुंडे यांचे मेहुणे यांनीही नोव्हेंबरपासून सदर महिला मुंडे कुटुंबाला ब्लॅकमेल करून धमकावत असल्याचा आरोप केला. त्यामुळे इतर प्रकरणांमध्ये पीडित महिलेला मिळत असलेली सहानुभूती या प्रकरणातील तक्रारदार महिलेला मिळत नव्हती. त्याबद्दलही काहींनी नापसंती व्यक्त केली.
१५ जानेवारीला तक्रारदार महिलेने तीन ट्वीट केले. त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे आहे:
वाचा संबंधित बातमी:
धनंजय मुंडेंच्या मदतीला भाजप नेत्यानंतर मनसे नेता आणि एअरलाइन्सचा अधिकारीही!
ट्वीट -१
“एक काम करा. तुम्हीच सर्व निर्णय घ्या. जे मला ओळखत नाहीत ते आणि जे मला ओळखतात तेही जर चुकीचे आरोप करत असतील, तर मीच माघार घेते, जसे तुम्हाला पाहिजे आहे.”
वाचा संबंधित बातमी:
“नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा”
ट्वीट -२
“जर मी जर चुकीची होती, तर आतापर्यंत एवढी लोक का नाहीत आलीत बोलायला? मी मागे हटली तरी मला स्वत:चा अभिमान असेल. संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी लढत होती. मी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नव्हते, तरीही…”
ट्वीट -३
“मला हटवण्यासाठी आणि पाडण्यासाठी एवढ्या लोकाना यावे लागले, ‘मी एकटी आणि विरोधात महाराष्ट्र’ आता तुम्हाला जे लिहायचे ते बसून लिहा. देवच तुम्हाला वाचवो.”
या महिलेने आता मीच मागे फिरते असे म्हटले असल्याने ती आता तक्रार मागे घेण्याची शक्यता असल्याचे मानले जात होते. बलात्कार प्रकरणात जर गुन्हा नोंदवला गेला असेल तर तडजोड शक्य नसते, मात्र या प्रकरणात पोलिसांचा तपासच सुरु असल्याने गुन्हा नोंदवला गेलेला नाही, त्यामुळे तिला माघार घेणे शक्य असल्याचे मत कायद्याचे जाणकार मांडत आहेत, असे मुक्तपीठच्या बातमीत म्हटले होते. आता नेमके तसेच घडल्याचे दिसत आहे.