मुक्तपीठ टीम
दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी काही हल्लेखोरांनी घोषणाबाजीसह हल्ला केला. गेले कित्येक दिवस सुरु असलेल्या कृषी कायद्यांविरोधी शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी आज दुपारी १ वाजता सिंघू सीमेवर गोंधळ झाला. काही लोक अचानक शेतकरी आंदोलन स्थळी पोहचले. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांकडे सीमा भाग मोकळा करण्याची मागणी केली. त्यांच्यातील गुंडांनी शेतकऱ्यांच्या आवश्यक वस्तूंची तोडफोड करायला सुरूवात केली. त्यानंतर शेतकरी आणि तोडफोड करणाऱ्यांमध्ये झटापट झाली. दोन्ही बाजूंनी परस्परांवर दगडफेकही करण्यात आली. शेतकरी आंदोलकांनी सीमाभाग मोकळा करावा, अशी हल्लेखोरांची मागणी होती. त्यांच्या आंदोलनामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचा त्यांचा आरोप आहे.
शेतकरी आंदोलक आणि स्थानिकांच्या झटापटीत पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्याचा माराही करावा लागला. या झटापटीत ५ पोलीस जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी स्थानिक आणि शेतकरी एकमेकांना भिडण्याआधी किसान मजदूर संघर्ष समितीचे नेते सतनाम सिंह पन्नू यांनी केंद्र सरकारवर सीमेवरील वातावरण बिघडवण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाचे वातावरण बिघडवले आहे. पण, कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही”.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंघू सीमेवर सुरक्षा दलांचा ताफा वाढवण्यात आला आहे. सर्व बाजूंनी भक्कम बॅरिकेड्स उभारले आहेत. तर टिकरी सीमेवरही सुरक्षेसाठी मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. कारण, या दोन्ही सीमा या शेतकरी आंदोलनाच्या केंद्रबिंदू आहेत.
ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर गेल्या २ दिवसांपासून पोलीस कारवाई करत होते. यामुळे, गाझीपूर सीमेवरील शेतकरी आंदोलन संपुष्टात येऊ शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी रात्री उशिरा दिलेल्या भावनिक संदेशानंतर हे आंदोलन अधिक तीव्र होऊ लागले आहे.