मुक्तपीठ टीम
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गेली अनेक दशकं परागंदा आहे. १९९३च्या बॉम्बस्फोटाच्या देशद्रोही घातपातानंतर तर तो पाकिस्तानातही समोर येत नाही. अशा या फरार आरोपीचं भारतातील कुटुंब कसं चालतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, आता आता ईडीच्या चौकशीत समोर आलेली नवी माहिती दाऊदच्या कुटुंबाचा खर्च कसा भागवला जातो, ते स्पष्ट करणारी आहे. दाऊद आपल्या कुटुंबाला दर महिन्याला दहा लाख रुपये पुरवतो. ते त्याच्या कुटुंबाकडे पोहचवले जातात. दाऊदच्या भावानेच ती रोकड दाखवत माहिती दिल्याचं एका साक्षीदारानं ईडीला सांगितलं आहे.
नवाब मलिक यांच्याविरोधात सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीदरम्यान साक्षीदार खालिद उस्मान शेख याने ईडीला महत्त्वाची माहिती दिली.त्यात खालिदने ही महत्वाची माहिती उघड केली. इक्बाल कासकरने आपल्याला दाऊदने पाठवलेली रोकड दाखवल्याचंही तो म्हणाला.
खालिद उस्मान शेखनं उघड केला दाऊदच्या कुटुंबाचा खर्च!
- साक्षीदार खालिद उस्मान शेख याने ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले, इक्बाल कासकरने त्याचा मोठा भाऊ दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचं सांगितले.
- इतकेच नाही तर दाऊद इब्राहिम प्रत्येक महिन्याला पाकिस्तानातून १० लाख रुपये आपल्या नातेवाईकांसाठी पाठवत असल्याचं ईडीच्या चौकशीत समोर आलं आहे.
- खालिदच्या म्हणण्यानुसार, इक्बाल कासकरने असेही सांगितले होते की दाऊद हे पैसे त्याच्या एका माणसामार्फत पाठवतो. त्यालाही दरमहा दहा लाख रुपये मिळतात.
- खालिद उस्मान शेख याने पुढे म्हटले, इक्बाल कासकर याने पैसेही दाखवले आणि हे पैसे दाऊद भाऊकडून आल्याचंही त्याने सांगितले.
दाऊदच्या नावावर लोकांकडून पैसे उकळत करतात वरकमाई!
- खालिद उस्मान शेखचा भाऊ, इक्बाल कासकर हे बालपणापासून मित्र आहेत.
- खालिदचा भाऊ एका टोळीयुद्धात मारला गेला होता.
- तो दाऊदची बहीण हसीना पारकरचा ड्रायव्हर होता.
- सलीम पटेल हा हसीना पारकरचा बॉडिगार्ड होता.
- लोक त्याला सलीम पटेल या नावाने ओळखत होते.
- खालिदने ईडीला सांगितले की, एकदा सलीमने त्याला सांगितले होती की तो दाऊदचे नाव वापरुन हसीनासोबत पैसे उकळत आहे.
- तसेच मालमत्ता सुद्धा हडप करत आहे.
- एकप्रकारे दाऊदने कुटुंबासाठी दिलेल्या मासिक खर्चाशिवाय त्याचे कुटुंबीय त्याच्या दहशतीच्या जोरावर वरकमाईही करत असतात.