मुक्तपीठ टीम
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पाठ्यपुस्तके आणि पुरक साहित्य तयार केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारतीने त्यासाठी निवड प्रक्रियेला सुरुवात केली आहे. पाठ्यपुस्तकांच्या व पूरक साहित्याच्या लेखन-संपादन, चित्राकृती इत्यादी कामासाठी शैक्षणिक स्तर व माध्यमनिहाय विविध विषयांच्या व भाषांच्या समित्या गठीत करण्यात येणार आहेत. ज्यांना त्यात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी बातमीसोबतची लिंक क्लिक करून सहभाग घ्यावा.
यासाठी भाषा व विषय समित्यांवर सदस्यांची निवड करणे तसेच आवश्यकतेनुसार पाठ्यपुस्तकांतील चित्राकृती तयार करण्यासाठी चित्रकारांची माहिती मिळवणे या उद्देशाने सोबतच्या लिंकवर अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी त्या त्या विषयातील तज्ज्ञ आणि इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी आपले अर्ज ऑनलाईन भरावेत. निवड समितीमार्फत योग्य त्या पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.अशी माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे. या समित्यावरील सदस्य निवडीसाठी शाळा मुख्याध्यापक व व्यवस्थापकाचे मंजुरी पत्र आवश्यक असणार आहे.
सदर अर्ज भरण्यासाठी पुढील लिंक वापरा:
https://academics.balbharati.in/newcommittees2022/
नव्या शैक्षणिक धोरणाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे या धर्तीवर नवी पाठ्यपुस्तके तयार होतील व त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल अशी प्रतिक्रिया क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल सरांनी व्यक्त केली. अध्ययन व अध्यापन प्रक्रियेसाठी बालभारतीच्या पुस्तकांचा दर्जा हा नेहमीच उच्च प्रतीचा राहिला व तो यापुढेही असाच राहील असे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले.