मुक्तपीठ टीम
भारतात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास लवकरच सुरुवात होणार आहे. मंगळवार, १२ जानेवारीला सीरम इन्स्टियूट ऑफ इंडियाकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसींचा साठा देशातील १३ वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठविण्यात आला. तर आता मुंबईत कोव्हिशिल्ड लसीचा पहिला साठा दाखल झाला आहे. तब्बल १ लाख ३९ हजार ५०० डोस मुंबईत पोहोचले आहेत.
मुंबईत लस साठवून ठेवण्यासाठी सुरुवातीला कांजूरमार्ग येथे महानगरपालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहे. या कोल्डस्टोरेजमध्ये एक कोटी लस साठवून ठेवण्याची क्षमता आहे. मात्र याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने आता लसींचा साठा परळ येथील आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परळ येथील एफ साऊथमधील कार्यालयात १० लाख लसींचा साठा केला जाऊ शकतो. तर आतापर्यंत लसीकरणासाठी को-विन अॅपवर एक लाख ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे.
दरम्यान, मुंबईमधील लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे. तथापि, शाळांमध्ये आवश्यक ती सर्वच वैद्यकीय यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात गरज भासली तरच पालिका शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष लसीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.