मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा प्रभाव हा आता ऑटो इंडस्ट्रीवर सुद्धा दिसू लागला आहे. देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन कंपनी हिरो मोटोकॉर्पने भारतातील झपाट्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आपले सर्व प्लांट व मॅन्युफॅक्चरिंग यूनिट बंद केले आहेत. २२ एप्रिल ते १ मे दरम्यान टप्प्याटप्प्याने हे युनिट बंद ठेवणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
उत्तरप्रदेशातील एका खत कारखान्यात १२५ आणि पुण्याच्या कारखान्यातील १६१ कामगारांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या नुकत्याच आल्या होत्या. कारखान्यांमध्ये सामूहिक लागण होत असल्याचे उघड होऊ लागल्याने उद्योग क्षेत्रात जास्त सावधगिरी बाळगण्यास सुरुवात झाल्याचे मानलं जात आहे.
हिरो ने दिलेल्या माहितीनुसार, या वेळेचा उपयोग त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये आवश्यक देखभालीची कामे करण्यासाठी केला जाईल. या तात्पुरत्या बंद दरम्यान कंपनीचे ग्लोबल पार्ट्स सेंटर देखील बंद राहील.
हिरोचे सर्व ६ प्लांट तात्पुरते बंद
- हरियाणा – गुरुग्राम
- हरियाणा – घारुहेरा
- आंध्र प्रदेश – चित्तूर
- उत्तराखंड – हरिद्वार
- राजस्थान – नीमराणा
- गुजरात – हलोल
या कारखान्यांमध्ये ८०,००० हून अधिक कर्मचारी कामावर आहेत.