मुक्तपीठ टीम
येत्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. या निवडणुकांसाठी काँग्रेस आपली रणनिती आखत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं विधान चर्चेत आहे. ज्यांना भीती वाटते त्यांनी काँग्रेसमधून खुशाल जावं. त्याचवेळी इतर पक्षांच्या हिंमतवान नेत्यांना काँग्रेसची दारे उघडी असल्याचे विधान राहुल गांधी यांनी दोन आठवड्यांपूर्वी केले होते. काँग्रेसच्या नेत्यांच्या मते, राहुल गांधींच्या या विधानातून काँग्रेसच्या बदलत्या रणनीतीचे संकेत मिळत आहेत.
मिशन २०२२साठी काँग्रेसची रणनीती
- राहुल गांधींनी मांडलेल्या भूमिकांमुळे काँग्रेसची रणनीती स्पष्ट होत असल्याचे नेत्यांना वाटते.
- काँग्रेस २०२२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ‘हिंमतवान’ उमेदवारांना प्राधान्य देणार आहे.
- काँग्रेस आगामी निवडणुकीत नवीन आणि तरुण चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करेल.
- गेल्या काही महिन्यांत काँग्रेसमधल्या अनेक तरुण नेत्यांनी राजीनामे दिले आहेत, त्यामुळे काँग्रेसचा चेहरा तरुण, उत्साही दाखवण्याची भूमिका आहे.
- त्याचबरोबर पक्षात नवीन चेहरे नसल्यामुळे जुन्या चेहऱ्यांना संधी देणे भाग पडत आहे, त्याचा फटका बसतो. त्यामुळे प्रसंगी इतर पक्षातून आलेल्या नेत्यांनाही संधी देण्याचा निर्णय झाला आहे.
वय-अनुभवानं नवे, पक्षातही नवे…चालतील!
- इतर पक्षांमधून येणाऱ्यांसाठी काँग्रेसची दारे उघडी आहेत.
- पक्षाने इतर पक्षांच्या नेत्यांना संघटनेत महत्त्वाची पदेही दिली आहेत.
- यामध्ये नाना पटोले (मूळ काँग्रेस पण भाजपमधून पुन्हा स्वगृही), नवज्योतसिंग सिद्धू (मूळ भाजपा) आणि रेवंत रेड्डी (मूळ तेलुगू देशम) यांचा समावेश आहे.
- हे नेते काही वर्षांपूर्वीच काँग्रेसमध्ये आले आहेत.
- पण त्यांना नव्या रणनीतीनुसारच मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्यात.
काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मते, भाजपा हा मोठा पक्ष कसा झाला आहे? अनेक पक्षातील नेत्यांनी राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. अशावेळी जर एखाद्या भाजपा नेत्याने राजीनामा देण्याचा धोका पत्करला तर त्याच्या हिंमतीला दाद देण्यासाठी संधी दिलीच पाहिजे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा संदर्भ देत ते म्हणाले की, पंजाब वगळता आमदार आणि नेत्यांना राजीनामे दिले आहेत, त्यामुळे पक्षाला नवीन चेहऱ्यांची गरज आहे.