मुक्तपीठ टीम
कॉंग्रेस पक्षाने काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. कोरोना संकटाचं कारण देत पक्षाने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. कार्य समितीत २३ जून रोजी निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. निवडणुकीची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल.
काँग्रेस कार्य समितीची बैठक आज पार पडली. निवडणूक पुढे ढकलण्याचा हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्यांदा टाळण्यात आली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष केले गेले. पण २ वर्षानंतरही पक्षाध्यक्षपदी निवड झालेली नाही. जूनमध्ये पुन्हा एकदा राहुल गांधींच्या हातात कॉंग्रेसची सूत्र दिली जाऊ शकतात, अशी चर्चा होती.
पक्षाचे अनेक नेते संघटनेची निवडणूक लवकरच घेण्यात यावी अशी मागणी करत असतानाच कॉंग्रेस पक्षाने अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित केली आहे. हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या २३ प्रमुख नेत्यांनी लवकर निवडणुकीची मागणी केली होती. संघटनेच्या निवडणुकांमुळे आणि पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे पक्षाला त्रास होत असल्याचे या नेत्यांनी बर्याच वेळा सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाचं कारण जरी योग्य असलं तरीही या असंतुष्ट नेत्यांमुळेही निवडणूक टाळण्याचा निर्णय झाला असावा, अशीही चर्चा आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षालाही पराभव स्वीकारावा लागला.. तामिळनाडूशिवाय इतरत्रही पक्षाला अत्यंत निराशाजनक निकाल मिळाले. पश्चिम बंगालमध्ये एकही जागा मिळवता आलेली नाही. आसाम आणि केरळमध्ये चांगल्या जागा मिळाल्या असल्या, तरी केरळमध्ये सत्ताबदलाची परंपरा मात्र खंडित झाली आहे.