मुक्तपीठ टीम
महागाईच्या मुद्द्यावरून सरकारच्या विरोधात जनजागरण अभियानांतर्गत काँग्रेस डिजिटल पद्धतीने लोकांना स्वतःशी जोडणार आहे. रविवारपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेत सहभागी होण्यासाठी पक्षाने एक क्रमांक जारी केला आहे. त्यावर ‘मिस कॉल’ देऊन महागाईविरुद्धच्या पक्षाच्या मोहिमेला कोणीही पाठिंबा देऊ शकतो. पत्रकारांशी बोलताना काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता म्हणाले की, कोणीही व्यक्ती १८००२१२००००११ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन या मोहिमेत सहभागी होऊ शकते.
काँग्रेसची डिजिटल मोहीम
- काँग्रेसच्या महागाईविरोधी डिजिटल मोहिमेत कोणालाही सहभागी होता येणार आहे.
- यासाठी १८००२१२००००११ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
- मिस्ड कॉल दिल्यावर लोकांना एसएमएस मिळेल. त्याच्यासोबत एक डिजिटल फॉर्म येईल.
- फॉर्म भरून लोक ‘जनजागरण अभियाना’ला आपला पाठिंबा नोंदवू शकतात.
‘जनजागरण अभियाना’अंतर्गत काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते देशातील विविध भागात पदयात्रा काढणार आहेत. जनसंवाद आणि इतर कार्यक्रमांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असेल. या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरीक, विशेषतः महिलांना महागाईविरोधातील आंदोलनाशी जोडले जावे, असा पक्षाचा प्रयत्न आहे.
रोहन गुप्ता म्हणाले की, जाहीर केलेल्या नंबरवर मिस्ड कॉल देऊन फॉर्म भरून नागरीक महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या प्रचाराला पाठिंबा देऊ शकतात. काँग्रेसच्या ‘जनजागरण अभियाना’अंतर्गत पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते विविध भागात पदयात्रा काढतील आणि जनसंवाद आणि इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शाश्वत चळवळीवरील समितीने महागाईच्या मुद्द्यावर ‘जनजागरण अभियाना’शी संबंधित कार्यक्रम ठरवले आहेत, ज्याला पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस कार्यकारिणीने मान्यता दिली आहे. ही मोहीम १४ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. मोदी सरकारविरोधातील काँग्रेसच्या या मोहिमेला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच कळेल.