मुक्तपीठ टीम
पश्चिम बंगालमधील निवडणुकीत काँग्रेसने डाव्या पक्षांबरोबरच इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या पक्षासोबत केलेली युती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आयएसएफ हा पक्ष तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या एका कट्टरपंथी नेत्याने स्थापन केला आहे. अशा पक्षाशी काँग्रेसने युती करणे काँग्रेसच्याच काही नेत्यांना खुपले आहे.
काँग्रेसमधील गांधींविरोधी ‘जी-२३’ या असंतुष्ट नेत्यांच्या गटातील आनंद शर्मा यांनी तर या नव्या युतीच्या निर्णयावर उघड टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “आयएसएफसारख्या पक्षाशी युती हे कॉंग्रेसच्या गांधीवादी विचारांच्या आणि नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत विचारांच्या विरोधात आहे”. आनंद शर्मा यांच्या टीकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधिर रंजन चौधरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना जबाबदारी झटकत पक्षश्रेष्ठींवर ढकलली आहे, “आम्ही एका राज्याचे प्रमुख आहोत. परवानगीशिवाय स्वत: हून कोणताही निर्णय घेत नाही. हा निर्णय पक्षाच्या प्रमुखांचाच आहे”.
Congress cannot be selective in fighting communalists but must do so in all its manifestations, irrespective of religion and colour. The presence and endorsement West Bengal PCC President is painful and shameful, he must clarify.
— Anand Sharma (@AnandSharmaINC) March 1, 2021
यावेळी कॉंग्रेस पक्ष आयएसएफ आणि डाव्यांसोबत बंगालमध्ये निवडणूक लढवणार आहे. आयएसएफला ३० जागा देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात शर्मा म्हणाले की, “आयएसएफसारख्या कट्टरपंथी पक्षाशी युती करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे आणि या निर्णयाला कॉंग्रेसच्या कार्यकारिणीने मान्यता दिली पाहिजे होती. सीडब्ल्यूसी म्हणजेच काँग्रेस कार्य समिती ही पक्षाशी संबंधित सर्वात मोठी निर्णय घेणारी संस्था आहे.”. शर्मा हे सीडब्ल्यूसीचे सदस्य आणि राज्यसभेतील कॉंग्रेसचे उपनेते आहेत.
या जागांवर कॉंग्रेस निवडणूक लढवेल
कॉंग्रेस आणि डाव्यांमध्ये येत्या निवडणूकीतील जागांवर वाटाघाटी झाली. अधीर रंजन चौधरी म्हणाले की,” कॉंग्रेस ९२ जागांवर निवडणूक लढवेल. उमेदवारांची यादी २ दिवसात जाहीर केली जाईल. आम्ही सुरुवातीला १३० जागा मागितल्या आहेत. आम्ही आरजेडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी जागा ठेवण्यास इच्छीत होती. आता आम्हाला त्यांना जागा वाटण्याची गरज नाही, पण आमची ऑफर इतर पक्षांसाठी खुली आहे”.
शर्मा ‘जी-२३’चे सदस्य
माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा हे ज्या २३ नेत्यांपैकी आहेत ज्यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या नेत्यांना ‘जी -२३’ असे नाव देण्यात आले आहे. या गटाने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्ष संघटनेत मोठा बदल करण्याची मागणी केली होती.
‘आयएसएफ’ वादग्रस्त का?
- ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ हा बंगालमधील सर्वात नवा पक्ष आहे.
- या पक्षाचे प्रमुख ३४ वर्षांचे पिरजादा अब्बास सिद्दीकी हे आहेत.
- ते हुगळी जिल्ह्यातील फुरफुरा शरीफ या मुस्लीम धर्मीयांमधील प्रभावशाली कुटुंबातील आहेत.
- मुस्लिम मतदारांवर पिरजादा यांचा चांगला प्रभाव मानला जातो.
- ते एकेकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी होते.
- परंतु त्यांनी तृणमूलची साथ सोडत ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ हा पक्ष स्थापन केला आहे.