मुक्तपीठ टीम
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कौल चार राज्यांमध्ये भाजपाला यशदायी ठरला आहे. पंजाब सोडून भाजपाला चार राज्यात दणदणीत विजय मिळाला. मात्र पाचपैकी एकाही राज्यात काँग्रेसला यश मिळालेले नाही. स्वत:ला काँग्रसचे शुभचिंतक म्हणवणारे जी-२३चे नाराज नेते आता जागे झाले आहेत. या नाराज नेत्यांनी पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संदर्भात शुक्रवारी सायंकाळी उशिरा पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी नाराज नेत्यांची बैठकही झाली. त्यांना काँग्रेसमधूनही प्रत्युतर मिळत असल्याने पराभवानं हादरलेल्या काँग्रेसचं ग़टबाजीचं शेपूट वाक़डंच असल्याचं दिसत आहे.
पक्ष कार्यकारिणीची लवकरच बैठक घेण्याची तयारी!
- पराभवाच्या कारणांचा विचार करण्यासाठी काँग्रेस पक्ष कार्यकारिणीची लवकरच बैठक घेण्याची तयारी करत आहे.
- या बैठकीपूर्वी पक्षातील नाराज नेत्यांनीही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
- त्यामुळे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर दबाव आणता येईल.
- या संदर्भात ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत आनंद शर्मा, कपिल सिब्बल आणि मनीष तिवारी यांच्यासह अनेक नाराज नेते उपस्थित होते. निवडणुकीत पक्षाच्या पराभवावर बैठकीत चर्चा झाली.
- एका नाराज नेत्याने सांगितले की, पराभवाची कारणे शोधण्यासाठी बोलावलेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते जोरदार मुद्दे मांडतील.
- या नेत्यांनी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळही मागितला आहे.
पक्ष नेतृत्वावर खापर, पण हे नाराज नेते होते कुठे?
- नाराज नेत्यांचे म्हणणे आहे की २०१४ नंतर लोकसभा आणि विविध विधानसभांच्या सुमारे ४५ निवडणुका झाल्या.
- मात्र, यापैकी केवळ पाच निवडणुका काँग्रेसला जिंकता आल्या आहेत. असे असतानाही पक्षाने कधीही पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला नाही.
- त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे.
- परंतु त्यांच्या पक्ष नेतृत्वार खापर फोडण्याच्या वृत्तीमुळे निष्ठावान त्यांच्यावर नाराज आहेत.
- हे नाराज नेते पक्षाची काळजी दाखवत असले तरी ते मुळात निवडणूक प्रचाराच्यावेळी कुठे असतात, का जोमाने भाजपाविरोधात जोमाने प्रचार करत नाहीत, असा प्रश्न विचारला जात आहे.