मुक्तपीठ टीम
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहेत. राज्यात सध्या चर्चेचा विषय असणाऱ्या मराठा आरक्षणासंदर्भात ही भेट असल्याची समजली जात आहे. त्यामुळे ठाकरे आणि मोदींच्या या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याला आरक्षणाचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. त्यामुळे आता केंद्र आणि राज्याने समन्वयाने प्रयत्न केले तरच मराठा समाजाला सुरक्षित आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भेट तोडगा काढणारी ठरू शकते.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या भेटीसाठी विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना मंगळवारी भेटीची वेळ दिली आहे.
मराठा समाजाची भेटीवर नजर
• पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मंगळवारी होणाऱ्या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे.
• या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकार कोणती पावले उचलू शकते. ज्याद्वारे मराठा आरक्षणाचा मुद्दा मोकळा होऊ शकतो, यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
• मराठा आरक्षणासाठी बाधक ठरलेली घटनादुरुस्ती व मागासवर्गीय आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात येण्याची शक्यता आहे.
• सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मोदी आणि ठाकरे यांची ही पहिली भेट आहे.
• या भेटीच्या माध्यमातून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागलं आहे.