मुक्तपीठ टीम
ठाण्यात घडलेली घटना देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. बेकायदेशीर फेरीवाल्यांविरोधात कारवाई करताना ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची बोटं गेली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज त्यांच्याशी स्वत: संवाद साधला. त्यांनी फोनवरुन कल्पिता यांची चौकशी केली. चौकशी करत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, “तुम्ही लवकर बरे व्हा, कारवाईची जबाबदारी आमची” असा दिलासा दिला.
कल्पिता पिंपळेंशी मुख्यमंत्री ठाकरे काय बोलले?
- कल्पिता पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.
- त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन केला.
- कल्पिता यांनी फोन घेताच मुख्यमंत्री म्हणाले की, “तुमचं कोणत्या शब्दांत कौतुक करावं. मी तुम्हाला शब्द देतो की…तुम्ही बरे झाल्यानंतर कारवाई करणार म्हणत आहात, पण आता ती जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. तुम्ही चिंता करु नका.
- यावेळी मुख्यमंत्र्यांनी कल्पिता यांच्या धाडसाचं कौतुक केले.
- मुख्यमंत्र्यांनी ठाणे पालिका आयुक्तांकडून अतिक्रमण विभागाच्या सुरु असलेल्या कारवाईचीही माहिती घेतली.
- याचबरोबर आता सरकार खटला लढवण्याकरीता विशेष वरिष्ठ वकिलांची नेमणूक करणार आहे.
- अमरजीत यादव याला नक्कीच शिक्षा होईल असेही मुख्यमंत्री ठाकरे कल्पिता यांना म्हणाले.
कल्पिता यांच्या एका बोटाची शस्त्रक्रिया मंगळवारी पहाटे ज्युपिटर रुग्णालयात करण्यात आली. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात अमरजीत विरोधात तक्रार ही नोंदविली आहे.
याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन पिंगळे यांची भेट घेतली. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे हल्ला झाल्यानंतर पिंपळेंना भेटले. त्यांच्या आदेशानंतर उपचारावर खास लक्ष देत ठाणे मनपाने जबाबदारी घेतली. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली.