मुक्तपीठ टीम
महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या वादामध्ये आता खासदार अमोल कोल्हेंच्या वक्तव्यामुळे पेट्रोल ओतले गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असे विधान खासदार अमोल कोल्हे यांनी केले होते. यावर शिवसेनेने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे, शिवसेना प्रवक्त्यांनी महाविकास आघाडीत विखार पसरवू नये, ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरु नका” असा सल्लाही शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी दिला आहे. मात्र, मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते असल्याने शरद पवारांचे आशीर्वाद असतात, असं म्हणत सेना-राष्ट्रवादीत भडकू पाहणाऱ्या आगीवर पाणी ओतण्याचा प्रयत्न केला आहे. या वादाला स्थानिक वाद म्हणून कमी लेखणाऱ्या संजय राऊत यांनी याच मतदारसंघातील स्थानिक वादात तेथे जाऊन राष्ट्रवादीच्या आमदाराला पाडण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे शिरुर मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
खासदार अमोल कोल्हेंच्या कोणत्या वक्तव्यावरून आग पेटली?
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत.
- राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे.
- निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे.
- मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय.
- दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळत आहे.
- वयस्कर नेते असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं. (त्यांचा रोख शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे होता.)
शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांचे कोल्हेंना तडाखेबंद उत्तर
- बहुतेक अमोल कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली आहे.
- तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसेच अमोल कोल्हे यांचे झाले आहे.
- आपण ज्या उद्धवसाहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले.
- अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?
- ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरु नका.
- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दस्तुरखुद्द शरद पवार साहेब सतत उद्धव साहेबांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत.
- त्यामुळे तुम्ही एवढा विचार करू नका, तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमताही नाही.
- त्यामुळे दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पाहा, फार डोके चालवू नका.
मुख्य प्रवक्ते संजय राऊतांचे वादावर पाणी
- तो माजी आणि आजी खासदारांमधील वाद आहे. असे वाद युतीतही स्थानिक पातळीवर होत होते.
- हे स्थानिक वाद आहेत, तेथेच मिटतील. त्याला राज्याच्या किंवा देशाच्या पातळीवरी नेत्यांशी जोडू नका. आम्ही त्या वादांकडे पाहतही नाही.
- हे स्वत: उद्धव ठाकरेंनीही मान्य केले आहे. या सरकारला आदरणीय शरद पवारसाहेबांचे आशीर्वाद आहेत. आशीर्वाद आहेतच ना.
- पवारसाहेबांचे अनुभव आणि वय आशीर्वाद देण्यासारखेच आहेत ना? आजही आम्ही त्यांच्या पायाला झुकून नमस्कार करतोच ना. मुख्यमंत्री अनेकदा करतात.
- शिवसेनाप्रमुखांच्या संदर्भात अनेक राजकीय पक्षांचे लोक एक आशीर्वादाचा हात आहे, म्हणूनच पायाला हात लावत असत.
- अमोल कोल्हेंच्या बोलण्याचा टोन वेगळा असतो. राणा भिमदेवी थाटात बोलले असतील. बोलू द्या.
- हे सरकार आहे ते तिघांच्या सहकार्यानं, तिघांच्या मदतीनं बनलेलं सरकार आहे. त्यात सोनिया गांधीही आहेत. माननीय पवारसाहेबही आहेत. आणि या सर्वाला उद्धव ठाकरेंनी संमती दिली नसती तर सरकार बनलं असतं का?
याआधी शिरुर मतदारसंघातील शिवसेना राष्ट्रवादी स्थानिक वादावर काय होती खासदार संजय राऊतांची भूमिका नक्की वाचा:
खेडमध्ये ठिणगी! पवारांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊतांचा राष्ट्रवादी आमदाराला आवाज!!