मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. गेले काही दिवस त्यांना ज्या कथित क्लीन चिटमुळे दिलासा मिळाल्यासारखे वाटले ते सारंच तात्पुरतं ठरलं आहे. आणि तीच क्लीन चिट देशमुखांना संकटात टाकणारी ठरली आहे. कारण क्लीन चिट देणारा तो प्राथमिक अहवाल फोडल्याप्रकरणी सीबीआयने देशमुखांचे वकिल आनंद डागा यांना अटक केली आहे. तसेच याआधी सीबीआयने अभिषेक तिवारी या त्यांच्याच विभागाच्या उपनिरीक्षकांना अटक केली आहे. तिवारी यांनी लाच घेऊनन अनिल देशमुख यांच्या वकिलाला कथित चौकशी अहवालाची प्रत दिल्याचा आरोप आहे.
तात्पुरता दिलासा, देशमुखांसाठी महागडा!
- गेल्या आठवड्यात मीडियामध्ये सीबीआयच्या चौकशी अहवालाचे एक पान लीक झाले होते.
- ज्यात अनिल देशमुख यांना कथितपणे क्लीन चिट देण्यात आल्याचे म्हटले होते.
- लीक झालेल्या अहवालात तपास अधिकाऱ्याने देशमुख यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्यने तपास थांबवण्याची शिफारस केल्याचा उल्लेख होता.
- देशमुख यांनी “कोणताही दखलपात्र गुन्हा केला नाही”. असे त्यात म्हटले होते.
- त्यानंतर या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
- देशमुख यांच्या निकटवर्तीयांनी एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन तपासाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे.
देशमुख यांच्या जावयाचीही चौकशी
- तपास अहवाल लीक झाल्यानंतर एजन्सीने सुरुवातीला देशमुख यांच्या जावयाची चौकशी केली होती.
- त्याची चौकशी केल्यानंतर आता आनंद डागा यांची चौकशी केली जात आहे.
- गेल्या आठवड्यात, तपास अधिकाऱ्याच्या शिफारशींविरोधात देशमुखविरोधात गुन्हा नोंदवल्याच्या अहवालानंतर, एजन्सीने सांगितले की, हा खटला उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या उत्तरार्ध दाखल करण्यात आला आहे.
सीबीआयवर राष्ट्रवादीचा आरोप
- सीबीआयने अनिल देशमुख यांच्या जावयाला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
- राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्यमंत्री नवाब मलिक म्हणाले की, त्याला ताब्यात घेण्यापूर्वी कोणतेही नियम किंवा कार्यवाही केली गेली नाही.
- वरळी येथील निवासस्थानापासून ते कुटुंबासह बाहेर जात होते.
- मग अचानक १०-१२ लोक आले आणि त्यांना ताब्यात घेतले. हे कायद्यानुसार नाही.
- हे कायद्याचे राज्य आहे की राज्यकर्त्यांचे राज्य? असा प्रश्न नवाब यांनी उपस्थित केला.
परमबिरांच्या शंभर कोटीच्या पत्रापासून देशमुखांमागे संकटांची मालिका
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपये वसुल केल्याचा आरोप करणारे तीन पानी पत्र जारी केले.
- देशमुख यांनी प्राथमिक चौकशीनंतर एप्रिलमध्ये राजीनामा दिला पण त्यांच्यावर झालेले आरोप नाकारले.
- यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले.
- न्यायालयाच्या निर्णयानंतर २४ एप्रिल रोजी देशमुख आणि काही अज्ञात लोकांविरोधात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या आरोपाखाली गुन्हे नोंदवून कारवाई सुरु आहे.
- त्यातच ईडीनेही देशमुखांच्या प्रकरणात स्वतंत्ररीत्या तपास सुरु केला आहे.
- त्यातच आता क्लीन चिट देणारा अहवाल मिळवण्यासाठी देशमुखांच्या निकटवर्तियांनी प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने नवे संकट ओढवले आहे.
क्लीन चिटचा किती फायदा?
- महाराष्ट्राचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी.के.जैन यांनी या प्रकरणातील पोलीस कार्यप्रणाली समजवून सांगितली आहे.
- या क्लीन चिटचा अनिल देशमुखांना जास्त फायदा होण्याची शक्यता नाही.
- जी प्रत सोशल मीडियात आणि मुख्य माध्यमांमध्येही चालली ती या प्रकरणात नंतर गुन्हा नोंदवणारे तपास अधिकारी मुंजाळ यांनीच लिहिलेल्या चौकशी अहवालाची असल्याचे सांगितले जाते.
- ती सादर झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी ती पुन्हा नव्याने तपास करून, नव्या काही मुद्द्यांचा समावेश करून त्या दिशेने नवा तपास करून तयार करण्यास सांगू शकतात.
- काहीवेळा प्राथमिक चौकशी अहवालानंतर नवे काही पुरावे समोर आले तर सुरुवातीला क्लीन चिट दिली असली तरी नंतर गंभीर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.
- त्यामुळे आधी क्लीन चिट दिली असली तरी नंतर गंभीर गुन्ह्याप्रकऱणी कारवाई अशक्य नसते.