मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांची चिंता वाढली आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्याही पुन्हा वाढू लागलीय. अशा परिस्थितीत हा धोका टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू करणे हे एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे. यावेळी, मुलांना लसवंत करण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. लहान मुलांसाठी लसीच्या डोससाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.
लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी सुरू
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी ट्विट केले आहे की, “मुले सुरक्षित असतील तर, देशाचे भविष्य सुरक्षित आहे! नव वर्षानिमित्ताने १५ ते १८ वयोगटातील मुलांची लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी सुरू आहे.”
आतापर्यंत ३.१५ लाख मुलांची नोंदणी
- १ जानेवारी २०२२ रोजी, रात्री ११.३० वाजेपर्यंत १५ ते १८ वयोगटातील ३ लाखांहून अधिक मुलांनी नोंदणी केली आहे.
- या मुलांचे आजपासून म्हणजेच ३ तारखेपासून लसीकरण करणे सुरू होईल.
मुलांसाठी फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा डोस मर्यादित असणार
- केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कळवले आहे की १५ ते १८ वयोगटातील मुलांना सध्या भारत बायोटेक कंपनीद्वारे निर्मित ‘कोव्हॅक्सिन’चा डोस दिला जाईल.
- केंद्र सरकारच्या अधिकृत अंदाजानुसार, या वयोगटातील अंदाजे १० कोटी मुले लसीकरणासाठी पात्र आहेत.
- १ जानेवारी २०२२ पासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे.
- याशिवाय आजपासून तुम्ही लसीकरण केंद्रावरही जाऊन थेट नोंदणी करू शकता.
२००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुलंही लसीसाठी पात्र
२००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या मुलांनाच सध्या कोरोनाची लस दिली जाईल, अशी माहिती सरकारकडून वयाबद्दल देण्यात आली आहे. ही लस १५ वर्षाखालील मुलांना दिली जाणार नाही. लसीचा दुसरा डोस २८ दिवसांनंतरच दिला जाईल.
नोंदणीची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या
- १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीचा स्लॉट बुक करण्यासाठी, प्रथम कोविन अॅपवर नोंदणी करावी लागेल.
- तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करावे लागेल. लस बुक करण्यासाठी मुलांचा फोटो प्रमाणपत्र देखील आवश्यक असेल. यानंतर तुम्ही स्लॉट बुक करू शकाल.
- तरुण मुलांकडे मतदार ओळखपत्रासारखी कागदपत्रे नसल्यास आधार कार्डाचा वापर केला जाईल.
- शाळेच्या ओळखपत्रासह लसीचा स्लॉट देखील बुक केला जाईल.
- ज्या मुलांकडे मोबाईल नाही, ते पालकांच्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी करू शकतात. नियमानुसार एका मोबाईलवरून ४ जणांची नोंदणी करता येते.
- केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी निर्धारित सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. लसीकरणाचा परिणाम पाहण्यासाठी मुलांना अर्धा तास निरिक्षणात ठेवण्यात येईल.