मुक्तपीठ टीम
कोरोनाला कमी लेखत सुरक्षा नियमांची अवहेलना करत स्वत: आणि इतरांना धोक्यात टाकणाऱ्यांना जागं करणारी बातमी आहे. कोरोना कोणालाही होऊ शकतो. ताजं उदाहरण तिहार कारागृहातील छोटा राजनचं आहे.
कुख्यात दहशतवादी माफिया डॉन दाऊद इब्राहिमही ज्याला घाबरतो त्या माफिया डॉन छोटा राजनला कोरोनाने गाठले आहे. उपचारासाठी राजनला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिहार तुरूंग अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सत्र न्यायालयात ही माहिती दिली आहे.
२०१५ मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून अटक झाल्यापासून राजनला नवी दिल्लीतील उच्च-सुरक्षा तिहार तुरूंगात ठेवण्यात आले आहे. त्याच्याविरोधात मुंबईत नोंदविण्यात आलेली सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहेत. तसेच त्याच्यावर खटला चालविण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे.
तिहार कारागृहाच्या सहाय्यक जेलरने सोमवारी फोनवर सत्र न्यायालयाला राजनला कोरोना झाल्याची माहिती दिली. त्यांनी एका खटल्याच्या सुनावणीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राजन याला न्यायाधीशांसमोर हजर करता येणार नाही. कारण, राजन कोरोना पॉझिटिव्ह आला असून उपचारासाठी त्याला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे कळवले.
मुंबई बॉम्बस्फोटांनंतर थेट दाऊदशी पंगा घेतल्याने चर्चेत आलेला छोटा राजन
- छोटा राजनच्या गुन्हेगारी कारकीर्दीची सुरुवात मुंबईतील टिळक नगरमधून झाली.
- तेथे तो सुरुवातील चित्रपटांच्या तिकिटांचे ब्लॅक करत असे.
- त्यानंतर त्याच्या कारवाया आणि गुन्हेगारी जगतातील संपर्क वाढत गेला.
- पुढे तो त्यावेळी मुंबईत वाढू लागलेल्या माफिया डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीत काम करु लागला.
- १९९३मध्ये दाऊदने मुंबईत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर राजन दाऊदपासून वेगळा झाला.
- छोटा राजनने मुंबईतील बॉम्बस्फोटांचा बदला घेण्यासाठी दाऊदला संपवण्याचे प्रयत्न केले.
- दहशतवादी कारवाया करणाऱ्या माफिया डॉनविरोधात आपण लढत असल्याचे दाखवत माफिया न म्हणून आपली वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता.
- तो १९९३ मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या हत्यांमुळे तो तसा चर्चेतही आला.
- त्याला माफिया डॉन संबोधलेले आवडत नाही, त्याचा तो विरोध करतो.
- राजनवर खंडणी आणि हत्या अशा गंभीर प्रकरणांशी संबधीत ७० हून अधिक प्रकरणे आहेत.
- २०११ मध्ये झालेल्या पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी राजनला दोषी ठरविण्यात आले आहे.
- २०१८ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
- गेल्या आठवड्यात मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हनीफ कडवालाच्या हत्येप्रकरणी राजन आणि त्याच्या साथीदारांना निर्दोष मुक्त केले.