मुक्तपीठ टीम
मालेगावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून राज्य सरकार निधीची कमतरता भासून देणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. मालेगाव एटीटी शाळेच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निवडक पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
यावेळी मालेगावचे शहराध्यक्ष असिफ शेख रशीद , जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, राजेंद्र भोसले, हाजी युसूफ, संदीप पवार, इजाज उमर, शाहिद रोशनवाला, अनिस सुफी, शफीक जानीबेग, आनंद भोसले, यास्मिन सैय्यद, ऍड.सुचिता सोनवणे, नदीम फणीवला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादीची विचारसरणी स्वीकारारून माजी आमदार असिफ शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आहे. त्यांचे सामाजिक काम बघून पक्षाने त्यांना लगेच अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्यांना सर्वांनी पाठबळ द्यावं त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकाधीक विस्तार मालेगाव मध्ये केला जाईल असे त्यांनी सांगितले. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालतो त्यामुळे आपल्याला सुद्धा हेच विचार जनतेपर्यंत पोहचविले पाहिजे. कोणतीही जात-पात धर्म न पाहता सर्वांना मदत केली पाहिजे.
ते म्हणाले की,कोरोनाच्या काळात मालेगाव हे देशातील सर्वाधिक रुग्णांच केंद्र बनलं पण या काळात यशस्वी नियोजन करून मालेगाव मध्ये कोरोना आटोक्यात आला. यामध्ये सर्व संस्था संघटना आणि प्रशासनाने दिवसरात्र काम केले आणि कोरोना आटोक्यात आणला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार असिफ शेख म्हणाले की, मालेगाव महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला जाईल. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.