मुक्तपीठ टीम
पालघर जिल्ह्यातील गाव–पाड्यांना जोडणारे रस्ते नसल्याने इथल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी उलटली तरीही ग्रामीण भागातील उपेक्षा अजूनही संपलेली दिसत नाही. मुंबई पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांना मूलभूत सुविधांअभावी आजही मोठ्या जिकरीचा सामना करावा लागत आहे. एका महिलेची अचानक तब्येत बिघडल्याने भर पावसात गावातील चार तरुणांनी प्लास्टिक आणि चादरीतून तिला रुग्णालयात दाखल केले. संबंधित घटना भीषण असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मोखाड्यातील मरकटवाडी पाडा येथे ६ जुलै रोजी सकाळी अचानक सुंदर किरकिरे या महिलेची प्रकृती खालावली. बाहेर प्रचंड पाऊस पडत होता आणि गावापर्यंत रस्ता नसल्याने कुटुंबासह गावकऱ्यांची ही तारांबळ उडाली. आता सुंदर यांना रुग्णालयात न्यायचे तरी कसे हा प्रश्नच होता. शेवटी गावातील चार तरुणांनी प्लास्टिक आणि चादरीची डोली तयार केली. भरपावसात चार किमीचा दरी पायपीट करत महिलेला मुख्यरस्त्यापर्यंत आणले. यानंतर तिथून वाहनाने सुंदर यांना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याआधी पालघरमध्ये गरोदर माता आणि रुग्णांची रस्त्यांअभावी उपचारासाठी तारांबळ!
- जव्हार तालुक्यातील झाप मनमोहाडी येथील गर्भवती महिलेला अचानक प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या.
- गावापर्यंत रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी गर्भवती महिलेला चादरीच्या डोलीत घेऊन हा डोंगर पार केला.
- जवळपास ७ ते ८लकिमी डोंगर चढून पायी प्रवास करत झाप येथील आरोग्य सबसेंटर येथे
त्या गरोदर मातेला प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु त्या आरोग्य सबसेंटर पुरेशा सुविधा अभावी जव्हार येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
मुंबई पासून मोखाडा हे अंतर १४० किमी आहे.
पालघरमधील खेडेगावात बालमृत्यू आणि माता मृत्यूंचे प्रमाणही जास्त आहे मात्र या सगळ्याकडे प्रशासन आणि सरकार लक्ष कधी देणार असा सवाल उपस्थित केला जातोय. ठाण्याचे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झाले असून आता तरी मुंबई, ठाण्यालगतच्या या आदिवासी पाड्यात प्राथमिक सुविधा उपलब्ध होतील का, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.