मुक्तपीठ टीम
बाबा केदारनाथांचा जयघोष झाला. हिंदू श्रद्धाळूंच्या जय घोषानं आसमंत दुमदुमला. कोट्यवधी हिंदूचे श्रद्धास्थान असलेली चारधामची यात्रा सुरु झाली आहे. अक्षयतृतीयेला चारधाम यात्रेचा शुभारंभ झाला. त्याआधी सोमवारी बाबा केदारनाथांचे शीतकालीन गादी स्थळ ओंकारेश्वर मंदिरातील पूजेनंतर आज बाबांची आणि गंगा मैयांचीही पालखी रवाना झाली. सोमवारी ऋषिकेश आणि हरिद्वार येथून यात्रेकरुंच्या ४० बसेस सोडण्यात आल्या आहेत.
चारधाम यात्रेला १२०० प्रवाशी निघाले आहेत. काही बसेस ऋषिकेशहून तर काही बस हरिद्वारहून सुटल्या आहेत. राज्यसभा खासदार नरेश बन्सल बसेसला हिरवी झेंडा दाखवला. ५ मे रोजी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी चारधाम यात्रेचे विधिवत उद्घाटन करतील. उल्लेखनीय आहे की, अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी ३ मे रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडून चारधाम यात्रा सुरू होईल. तर केदारनाथचे दरवाजे ६ मे आणि बद्रीनाथचे दरवाजे ८ मे रोजी उघडतील.
चारधाम यात्रेसाठी आतापर्यंत सुमारे २.५० लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. चारधाम आणि यात्रा मार्गावर येत्या दोन महिन्यांसाठी हॉटेल्समधील खोल्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. तसेच केदारनाथ हेली सेवेच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंग २० मे पर्यंत करण्यात आले आहे. भाविकांची गर्दी पाहता गढवाल मंडल विकास निगमच्या माध्यमातून पर्यटन विभागाने केदारनाथमध्ये तंबू टाकून १ हजार लोकांच्या राहण्याची अतिरिक्त व्यवस्था केली आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री धाममधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने दररोज प्रवाशांची संख्या निश्चित केली आहे.
चारधाम यात्रेकरूंच्या स्वागतासाठी उत्तराखंड पूर्णपणे सज्ज
चारधाम यात्रेकरूंच्या स्वागतासाठी उत्तराखंड सज्ज झाले आहे. यंदा चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. यावेळी चारधाम यात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंचा नवा विक्रम होणार आहे.
पाहा व्हिडीओ: