मुक्तपीठ टीम
कुंभार समाजाचे कोरोना काळात झालेले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गणेशोत्सवातील मूर्तींची उंचीची मर्यादा रद्द करावी किंवा कुंभार समाजाला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.
चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, गणेशोत्सव दोन महिन्यावर आला असता राज्य सरकारने मंडळांच्या मूर्ती ४ तर घरगुती मूर्ती २ फुटांपर्यंत असाव्यात, असे निर्बंध घातले आहेत. शासनाच्या एकतर्फी निर्णयामुळे कुंभार समाजाला आर्थिक फटका बसणार आहे. कुंभार बांधव गणेशमूर्ती तयार करण्याची सुरूवात जानेवारी महिन्यापासून करत असतात. आजच्या घडीला ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या शिल्लक गणेश मूर्ती आणि यंदाच्या तयार ५ ते १० फुटांच्या मूर्ती यांचे काय करायचे, असा प्रश्न अचानकपणे समाजासमोर निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई कशी करायची, बँक कर्जाचे हप्ते फेडायचे कसे, असे अनेक प्रश्न आज कुंभार समाजासमोर निर्माण झाले आहेत.
त्यांनी म्हटले आहे की, राज्याच्या काही भागात आलेला महापूर आणि त्यापाठोपाठ आलेला कोरोना अशा दुहेरी संकटामुळे गेल्या तीन वर्षापासून कुंभार समाजाची अवस्था बिकट बनली आहे. मूर्ती बनवण्यासाठी बॅंकांच्या माध्यमातून घेतलेले कर्ज फेडणे कुंभार बांधवांना अशक्य झाले आहे.