मुक्तपीठ टीम
राज्यातील सहा जिल्हा परिषदा आणि ३८ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीला राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या असून त्याबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांनी सत्तेचा पुरेपूर वापर केला तरीही मतदारांनी भाजपाला पहिली पसंती दिली आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात सत्तेवर असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता व भाजपा विरोधी पक्ष असला तरीही तोच ट्रेंड आज कायम राहिला आहे.
त्यांनी सांगितले की, राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती करून पूर्ण बहुमताने विजय मिळविला. त्यानंतर विरोधी पक्षात बसावे लागले तरीही भाजपाला जनतेचा पाठिंबा टिकून आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिडवणुकीत भाजपाला विजय मिळाला. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. आगामी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकतही भाजपा विजयी होईल याचा आपल्याला विश्वास आहे.
ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात ओबीसी राजकीय आरक्षणाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याने न्यायालयाने या ओबीसी आरक्षित जागांवरील निवडणूक रद्द केली होती आणि मतदारांवर पोटनिवडणुकीची वेळ आली. या जागा खुल्या झाल्या तरीही ओबीसी उमेदवार देऊन भाजपाने आपली बांधिलकी पाळली. मतदारांनी भाजपाला सर्वाधिक जागांवर विजयी करून पक्षाला पाठिंबा दिल्याचे निकालावरून दिसते. आपण मतदारांचे भाजपातर्फे आभार मानतो.