मुक्तपीठ टीम
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं वाहनांच्या विविध श्रेणींसाठी थर्ड पार्टी विमा प्रीमियममध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. विम्याचे नवे दर हे पुढील आर्थिक वर्षापासून लागू होणार आहेत. म्हणजेच येत्या एप्रिल महिन्यापासून वाहनांसाठी जास्त विमा प्रीमियम भरावा लागणार आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांच्या स्थगितीनंतर सुधारित विमा प्रीमियम १ एप्रिलपासून लागू होईल. यापूर्वी दर विमा नियामक आयआरडीओआयद्वारे अधिसूचित केले गेले होते. विमा नियामकाशी सल्लामसलत करून रस्ते वाहतूक मंत्रालय हे दर अधिसूचित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सरकारचा प्रस्ताव
- प्रस्तावित सुधारित दरांनुसार, १ हजार सीसी क्षमता असलेल्या खासगी कारसाठी विमा खर्च २०१९-२० मधील २ हजार ७२ रुपयांच्या तुलनेत २ हजार ९४ रुपये असेल.
- त्याचप्रमाणे, एक हजार सीसी ते दीड सीसी पर्यंतच्या खासगी गाड्यांवर ३ हजार २२१ रुपयांच्या तुलनेत विमा खर्च ३ हजार ४१६ रुपये असेल, तर १ हजार ५०० सीसी वरील कार मालकांना ७ हजार ८९० रुपयांच्या तुलनेत ७ हजार ८९७ रुपये प्रीमियम दर लागू होईल.
- दुचाकी वाहनांसाठी दीडशे सीसी ते साडे तीनशे सीसी इंजिन क्षमता असलेल्या वाहनांसाठी १ हजार ३६६ रुपये प्रीमियम दर असेल.
- तर साडे तीनशे पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या वाहनांसाठी २ हजार ८४ रुपयांचा प्रीमियम लागू असेल.
- दरम्यान, २०१९-२० च्या प्रस्तावानुसार इलेक्ट्रिक खासगी वाहन, इलेक्ट्रिक दुचाकी आणि हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांना प्रीमियमधून सूट कायम राहील.
- ही सूट पर्यावरण पूरक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने म्हटलंय.
थर्ड पार्टी विमा म्हणजे काय?
- थर्ड पार्टी विमा हा लायबिलीटी कव्हरच्या नावानेही ओळखले जाते.
- वाहनांच्या अपघातात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचं नुकसान होऊ शकते.
- थर्ड पार्टी विमा हा तिसऱ्या व्यक्तीसाठी संबंधित असतो. एखाद्या वाहनाच्या अपघातात तर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं नुकसान झालं तर विमा कंपनी वाहनाच्या अपघातासाठी त्या तिसऱ्या व्यक्तीला क्लेम देते.
- आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी थर्ड पार्टी इन्श्यूरन्स अनिवार्य करण्यात आलाय.
- त्याचा प्रीमियम भरून वाहन मालक या विम्याचा लाभ घेऊ शकतात.