मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या १५ बंडखोर आमदारांसह त्यांच्या कुटुबीयांना केंद्रातील मोदी सरकारकडून ‘Y+’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्या पोलीस असतानाही त्यांना केंद्राकडून ही सुरक्षा का मिळाली, असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. पण ही सुरक्षा मिळण्यात शिवसेना नेत्यांच्या डरकाळ्यांचा आणि शिवसैनिकांच्या रस्तोरस्ती उसळलेल्या संतापाचा मोठा वाटा आहे.
शिवसेना नेते संजय राऊत सातत्याने बंडखोर आमदारांना मुंबईत येण्याचा इशारा देत असतात तर, दुसरीकडे शिवसैनिक रस्त्यावर उतरून बंडखोर आमदारांचा निषेध करत आहेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंनीही महाराष्ट्र पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तसे निर्देशही दिले होते. पण केंद्रीय गृहमंत्रालयाला असलेल्या विशेषाधिकारांचा वापर करुन ही सुरक्षा देण्यात आल्याचे कळते.
काय होता संजय राऊतांचा ईशारा?
- गुवाहाटी गाठलेल्या शिवसेनेच्या आमदारांना संजय राऊत वारंवार मुंबईत या मग कळेल, असा इशारा देत आहेत.
- आजही लाखो शिवसैनिक आमच्या एका इशाऱ्याची वाट पाहत आहेत, त्यांना मुंबईत यावे लागेल, असे ते म्हणाले.
- शनिवारी शिवसैनिकांनी काही बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोडही केली.
एकनाथ शिंदेंनीही लिहिले होते पत्र
- शनिवारी शिवसेनेचे बंडखोर नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे डीजीपी यांना पत्र लिहिले.
- गुवाहाटीला पोहोचलेल्या आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी या पत्रात करण्यात आली होती.
- याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले होते की, फक्त आमदारांनाच सुरक्षा देण्यात आली आहे, त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा दिली जाऊ शकत नाही.
- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांच्या कुटुंबीयांनाही सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले होते.
उपसभापतींविरोधात शिंदे गट न्यायालयात जाणार…
- महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींविरोधात शिंदे गट न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.
- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्याविरोधात कायदेशीर मत मागवल्यानंतर शिंदे गट कोर्टात जाऊ शकतो.
- उपसभापतींनी नोटिसा बजावल्यानंतर उत्तर देण्यासाठी आमदारांना किमान आठवडाभराचा अवधी द्यायला हवा होता, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे.
शिवसेनेच्या या आमदारांना मिळाली केंद्राची सुरक्षा!
१. सदा सरवणकर
२. रमेश बोरनारे
३. मंगेश कुडाळकर
४. संजय शिरसाट
५. लताबाई सोनवणे
६. प्रकाश सुर्वे
७. योगेश कदम
८. प्रताप सरनाईक
९. यामिनी जाधव
१०. प्रदीप जैस्वाल
११. संजय राठोड
१२. दादाजी भुसे
१३. दिलीप लांडे
१४. बालाजी किणीकर
१५. संदीपान भुमरे