मुक्तपीठ टीम
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य होरपळत आहे. पण त्याचवेळी सरकारी उत्पन्न मात्र कर संकलन वाढल्यामुळे वाढतच आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच महागाईचे चटके सरकारी कर्मचाऱ्यांनाही बसत आहे. पण त्यांना मात्र त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
‘या’ कारणामुळे महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता
- केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करू शकते. याचे कारण एआयसीपीआय निर्देशांकात सलग दोन महिन्यांच्या घसरणीनंतर मार्च २०२२ मध्ये झेप घेतली आहे.
- त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना डीए म्हणजेच महागाई भत्ता वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.
- यावेळीही महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
दोनदा महागाई भत्ता ठरवला जातो
- ७व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता दिला जातो.
- जानेवारी महिन्यात एकदा आणि जुलै महिन्यात दुसऱ्यांदा महागाई भत्ता दिला जातो. अशा परिस्थितीत एप्रिल, मे आणि जूनची संपूर्ण आकडेवारी समोर आल्यानंतरच केंद्र सरकार महागाई भत्त्याबाबत निर्णय घेईल, असे सांगण्यात येत आहे.
- मात्र, त्यात झेप घेतल्यास सरकार जुलै महिन्यात डीएमध्ये आणखी एक वाढ करू शकते, हे स्पष्ट झाले आहे.
महागाई भत्ता किती वाढेल
- केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ३४ टक्के महागाई भत्ता मिळतो.
- आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढवला तर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३७ टक्के होईल.
- असे झाल्यास ५० लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि ६५ लाखांहून अधिक पेन्शनधारकांना थेट लाभ मिळेल.