मुक्तपीठ टीम
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेल्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेने गत वर्षी १०० वर्षे पूर्ण केली. शताब्दी सांगता निमित्त संस्थेच्या १०१ व्या वर्धापनदिनी म्हणजे ९ जून २०२२ रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे.
सकाळी होणाऱ्या सत्रात भारतीय हवाई दल प्रमुख मा. प्रदीप नाईक (निवृत्त), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे.
मराठी शाळेला १०० वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण केले आहे तसेच १०० वर्षांचा इतिहास डिजिटल स्वरुपात शाळेच्या लॉबीमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थ्यांना संरक्षण दलात जाण्याची प्रेरणा मिळावी या हेतूने शाळेत एक विशेष शौर्य कक्ष तयार करण्यात आलेला आहे. या सर्वाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. तर संध्याकाळच्या कार्यक्रमात राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी, पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे उपस्थित राहणार आहेत.
या वेळी शताब्दी गौरव ग्रंथाचे प्रकाशन माननीय राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. संस्थेच्या पार्ले येथील मराठी शाळेच्या भव्य प्रांगणात हा सर्व कार्यक्रम होणार असून त्यासाठी भव्य मंडप आणि देखणा मंच उभारण्यात आला आहे. या विशेष दिवसाचा शेवट संस्थेच्या विविध शाळातील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येवून तयार केलेल्या समूह वादन, गायन, नृत्य आणि नाटक या कला गुण दर्शनाच्या कार्यक्रमाने करण्यात येणार आहे. पार्लेकरांसाठी हा सोहळा अत्यंत जिव्हाळ्याचा असून या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातील मान्यवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असणार आहे.