मुक्तपीठ टीम
महावसुलीच्या आरोपामुळे गृहमंत्रीपदावरुन पायउतार झालेल्या अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुखांवर कारवाई केली आहे. त्याचबरोबर देशमुखांशी संबंधित विविध ठिकाणांवर छापेमारीस सुरुवात केली आहे. अनिल देशमुखांसह इतरांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केलेली रक्कम ही शंभर कोटींसारखी प्रचंड मोठी असल्याने स्वाभाविकच आता ईडीचाही याप्रकरणात प्रवेश होणे निश्चित मानले जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय गेले १५ दिवस या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करत होती. यादरम्यान, ७ ते ८ जणांचा जबाब नोंदवला होता. तसेच अनिल देशमुखांचीही चौकशी करुन जबाब नोदंविण्यात आला होता. प्राथमिक चौकशीनंतर एक अहवाल तयार करुन सीबीआयच्या वरिष्ठांकडे सदर करण्यात आला. त्यानंतर सीबीआयने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याचे मोठे पाऊल उचलले आहे.
आतापर्यंत काय झाले?
- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती.
- याप्रकरणी पोलीस आधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली.
- यानंततर याप्रकरणाला वेगवेगळी वळणं मिळण्यास सुरुवात झाली.
- याच दरम्यान परमबीर सिंह यांची पोलीस आयुक्त पदावरुन उचल बांगडी करण्यात आली.
- त्यावेळी सिंह यांच्याकडून तपासात गंभीर चुका झाल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले होते.
- त्यानंतर सिंह यांनी अनिल देशमुखांनी पोलिसांना १०० कोटींच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करणारा लेटर बॉम्ब टाकला होता.
- याप्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालयात आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची पायरी चढली होती.
- मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
- त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
- तर आज सीबीआयने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केला आहे.