मुक्तपीठ टीम
‘बुल्लीबाई’ अॅप प्रकरणातील आरोपी विशाल कुमारला मंगळवारी मुंबईतील वांद्रे न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे. या दरम्यान तो पोलिसांना या अॅपच्या कटातील मूळ सूत्रधारांची माहिती देईल का की हे प्रकरण फक्त विशाल हा तरुण आणि त्याची तरुण मैत्रीण श्वेता सिंहच्या अटकेपर्यंतच संपेल असा मुद्दा चर्चेत आला आहे. मुस्लिम महिलांविरोधात अपमानास्पद आणि असभ्य भाषेचा आरोप विशाल कुमारवर आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका मुख्य संशयित आरोपी श्वेता सिंहला उत्तराखंडमधून अटक केली आहे. तिची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘बुल्ली बाई’ अॅप आरोपी विशाल कुमारचे वकील डी प्रजापती यांनी मीडियाला सांगितले की, त्याच्या अशिलाला १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ते म्हणाले की, त्यांच्या अशिलाला या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी न्यायालयात अर्ज देऊन सर्च वॉरंट जारी करण्याची विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले.
एका महिला पत्रकाराने केलेल्या ट्विटनंतर ‘बुल्ली बाई’ अॅपच्या कृत्यांचा पर्दाफाश झाला. ‘बुल्ली बाई’ने महिलांच्या छायाचित्रांचा गैरवापर केल्याचे समोर आल्याने महिला पत्रकार अचंबित झाली. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि शशी थरूर यांसारख्या नेत्यांनीही ‘बुल्ली बाई’ अॅपविरोधात आवाज उठवला. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींच्या मागणीनंतर मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने या प्रकरणी तपास सुरु केला.
सोशल मीडियावर पूर्ण ताकदीने बोलणाऱ्या १०० प्रसिद्ध मुस्लिम महिलांविरुद्ध अपमानास्पद गोष्टी करण्याचा कटातून अॅप लाँच झाले, असा आरोप आहे. ‘बुल्ली बाई’ अॅपच्या माध्यमातून विशालने श्वेता सिंह या तरुणीसोबत महिलांविरोधात अपमानास्पद, बदनामीकारक कुकृत्य केल्याचा आरोप आहे.
एवढेच नाही तर उत्तराखंडमधील या महिलेने तिच्या मैत्रिणीसोबत महिलांसाठी बोली लावण्यासारखे घृणास्पद कामही केले. त्यानंतर पोलिसांनी श्वेता सिंहचा साथीदार विशाल कुमार याला बंगळुरू येथून अटक केली.
अभियांत्रिकीचा विद्यार्थी विशाल कुमार (21) हा ‘बुल्ली बाई’ अॅप प्रकरणातील श्वेता सिंह या मुख्य आरोपी महिलेचा ओळखीचा आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर दोघेही मित्र आहेत. विशालला अटक करण्याआधीच पोलिसांनी उत्तराखंडच्या श्वेता सिंहला ताब्यात घेतले होते.
‘बुल्ली बाई’ अॅपच्या माध्यमातून अनेक महिला पत्रकारांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ‘बुल्ली बाई’ अॅप ब्लॉक करण्यात आले आहे. तसेच पुढील कार्यवाही सुरू आहे. गेल्या वर्षी सुली डील्सवरही असेच प्रकरण समोर आले होते.