मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासन जास्तीत जास्त काळजी घेत आहे. नागरिकांनी काळजी घेतली नाही तर लॉकडाऊन अपरिहार्य मानले जात आहे. परंतु अनेकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. डोंबिवलीतील असाच एक धक्कादायक प्रकार म्हैशीच्या वाढदिवसाच्या पार्टीचा घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्या म्हैस मालकाविरोधात गुन्हाही नोंदवला आहे.
डोबिंवलीत एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे तेथेच एकाने आपल्या म्हैशीचा वाढदिवस धुमधडाक्यात पार्टी देऊन साजरा केला. इतकेच नाही तर या कार्यक्रमात कोरोनाशी संबंधित नियम देखील पाळले गेले नाहीत. या म्हैशीच्या मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे पूर्ण प्रकार?
- कोरोना संसर्ग वाढत असतानाही किरण म्हात्रे यांनी म्हैशीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डोंबिवलीच्या रेतीबंदरमधील आपल्या राहत्या घरी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
- विष्णूनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैशीच्या वाढदिवस पार्टीनिमित्ताने जमलेल्या लोकांपैकी बहुतेकांनी मास्कही घातलेला नव्हता.
- कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन केले गेले नाही.
- या आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम २६९ आणि कोरोना माहामारीच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.