मुक्तपीठ टीम
एकीकडे मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी प्रत्येक राजकीय पक्ष चेवाचेवानं बोलत असला तरी प्रत्यक्षात मुंबईतील मराठी भाषिक शाळांची संख्या ही झपाट्यानं घसरत आहे. शिवसेनेची सत्ता असतानाही मुंबई मनपाच्या शाळांची संख्या गेल्या दहा वर्षांमध्ये कमालीची घसरत चालली आहे. स्वाभाविकच आगामी मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आता भाजपानं या मुद्द्यावरही शिवसेनेला घेरण्यास सुरुवात केली आहे.
२०१० साली मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या ४१३ मराठी शाळा होत्या. ही संख्या आज २८३ वर आलेली आहे. २०१० साली मराठा मुलांची पटसंख्या ही एक लाख २२१४ होती जी, आज अवघ्या ३५ हजारांवर येऊन थांबलेली आहे. अर्थात ही संख्या कनिष्ठ आर्थिक वर्गातील पालकांमध्ये असलेल्या इंग्रजी माध्यम किंवा खासगी शाळांच्या आकर्षणातून असल्याचे कारण नेहमीच सांगितले जाते. पण दुसरे कारण घरापासून मराठी शाळा दूर लोटणे हेही असल्याचे सांगितले जाते. उदाहरणादाखल मुंबईच्या जुहू भागातील गांधीग्राम मनपा मराठी शाळेचे सांगितले जाते. ही शाळा बंद झाली. गेल्या वर्षी पाडण्यात आली. तेथे असलेल्या मुलांना गाडीने अर्ध्यातासावर अंधेरी पश्चिम येथील टाटा कंपाऊंड शाळेत स्थानांतरीत करण्यात आले. जुनी इमारत असल्याने ती पाडणे आवश्यक असेलही, पण आजवर ती इमारत पुनर्बांधणीबद्दल काहीच पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे संशयही व्यक्त केला जात आहे.
माहिती अधिकाराखाली धक्कादायक माहिती
मुंबई मनपाचे शिक्षण अधिकारी राजू तडवी यांनी माहिती अधिकाराखाली पुरवलेली माहिती ही धक्कादायक आहे. मुंबईच्या मनपाच्यावतीनं मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये चालवण्यात येणाऱ्या मराठी शाळांविषयीची माहिती मागवण्यात आली होती. त्याला उत्तर देताना तडवी यांनी ही माहिती उघड केली आहे.
वर्ष मराठी शाळा विद्यार्थी
• २०१०-११ ४१३ १०२२१४
• २०११-१२ ३९६ ९२३३५
• २०१२-१३ ३८५ ८१२१६
• २०१३-१४ ३७५ ६९३३०
• २०१४-१५ ३६८ ६३३३५
• २०१५-१६ ३५० ५८६३७
• २०१६-१७ ३२८ ४७९४०
• २०१७-१८ ३१४ ४२५३५
• २०१८-१९ २८७ ३६५१७
• २०१९-२० २८३ ३५१८१
•२०२०-२१ २८० सदर माहितीच्या अंतिमीकरणाचे काम सुरु आहे.
बदलतं वर्ष, घटत्या मराठी शाळा!
विलेपार्ले पश्चिममधील प्रभाग क्र. ७१ चे भाजपा नगरसेवक अनिष नवल मकवानी यांच्या मनात मराठी शाळांचा मुद्दा जुहूमधील एक मराठी शाळा बंद झाल्यानंतर आला. त्यांनी त्यानंतर माहिती अधिकाराखाली मनपाकडे मराठी शाळांची गेल्या दहा वर्षातील माहिती मागवली. त्यावर शिक्षणाधिकारी तडवी यांनी वरील आकडेवारी दिली.
शिवसेनेने गेली ३० वर्ष काय केले?
स्थानिक आमदार अमित साटम यांनी याविषयावर तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत.
“संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मराठी बाणा जपण्यासाठी १०७ हुतात्मे गेले. शिवसेनेने गेली ३० वर्ष मराठी अस्मितेचा आधार घेत मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता गाजवली. परंतु, मुंबईतून मराठी माणूस हा बाहेर फेकला गेलेला आहे आणि तशीच काहीशी अवस्था मुंबईतील मराठी शाळेची आणि मराठी भाषेची दिसून येते. अशीच जर मराठी भाषेची अधोगती सुरू राहिली तर, येत्या ५ वर्षांमध्ये मराठी माणसाला आपल्या हक्काची एकही मराठी शाळा ही उरणार नाही. त्यामुळे ३० वर्ष मुंबई महानगरपालिकेवर मराठी बाण्याचा आधार घेत ज्यांनी सत्ता राबविली या मराठीच्या अधोगतीकडे पाहून मला कवीवर्य कुसुमाग्रजांच्या त्या दोन ओळी आठवतात की, ‘मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे.'”