मुक्तपीठ टीम
भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते सर्वच आता भगव्या रंगाच्या टोप्यांमध्ये दिसणार आहेत. ही टोपी भाजपा कार्यकर्त्यांची ओळख बनणार आहे. ही टोपी भाजपाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांव्यतिरिक्त सर्व बड्या नेत्यांना पाठवली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या रोड शोमध्ये ही टोपी घातली होती. या टोपीमागे डोकं आहे ते एका मराठी भाजपा नेत्याचं!
भाजपाच्या प्रत्येक खासदारापर्यंत ही टोपी पोहोचवण्याची जबाबदारी भाजपा संसदीय पक्ष कार्यालयाला देण्यात आली आहे. लोकसभा आणि राज्यसभेसह भाजपाच्या सर्व ४०० खासदारांना किटसह ही टोपी दिली जात आहे. किटमध्ये भाजपा चिन्ह असलेल्या पाच टोप्या आणि एनर्जी बार आहेत. भाजपाचे खासदार सार्वजनिक ठिकाणी ही टोपी घालतील, असे अपेक्षित आहे.
याशिवाय भाजपाचे कार्यकर्ते भगवी टोपी आणि उपरणं घालतील. या टोपीमागे गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचं डोकं आहे. त्यांनी काही विद्यार्थ्यांच्या मदतीने ही खास टोपी तयार केली आहे. या नवीन टोपीच्या डिझाईनमध्ये कमळ ही भाजपाची निशाणीही आहे. पंतप्रधान मोदींनी प्रजासत्ताक दिनीही ही टोपी परिधान केली होती.
भगवी टोपीचं नातं जुनं…
- भगवी टोपी भारतीय जनता पक्षाच्या वैचारिक परंपरेशी नातं सांगणारी आहे.
- स्वातंत्र्यापूर्वी संघाचे कार्यकर्ते भगव्या रंगाच्या टोप्या घालायचे.
- आता भाजपा हीच टोपी आपली ओळख बनवणार आहे.
- भगव्या टोपीमध्ये कमळाचे फूल आहे.
- एकप्रकारे भाजपाची ही अधिकृत टोपी होणार आहे.