मुक्तपीठ टीम
वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी आपल्याला कुटुंबाकडून मारहाण होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पूजा तडस यांनी रडत रडत व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे मदत मागितली आहे. पूजा तडस यांचा हा व्हिडीओ असल्याचा दावा करत चाकणकर यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी पूजा यांच्या संरक्षणासाठी पोहोचल्या आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी ट्वीटद्वारे दिली. दरम्यान, भाजपा खासदारांच्या सूनेनं न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांना साकडं घातल्यानं आता नेटकरी भाजपाच्या चित्रा वाघांना पिडत आहेत. आता चित्रा वाघ गेल्या तरी कुठे? स्वपक्षातील महिला अत्याचार दिसत नाही का, असा सवाल विचारला जात आहे.
पूजा तडस यांचा आरोप काय आहे?
- पूजा तडस यांचा हा व्हिडीओ १२ सेकंदांचा आहे.
- या व्हिडीओतली वाक्य….मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते.
वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन यांना गेली अनेक दिवस हे तडस कुटूंब मारहाण करून अत्याचार करीत आहेत.पुजाचा आताच हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला, तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलिस सरंक्षणासाठी पोहचले आहेत. @NagpurPolice@maharashtra_hmo pic.twitter.com/PHAxlD2X3F
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 8, 2021
काय म्हणाल्यात रुपाली चाकणकर?
- मला आज सकाळी लवकरच पूजाचा फोन आला. फोनवर त्या रडत होत्या. माझ्याकडे मदतीची मागणी त्या करीत होत्या. त्यानंतर मला त्यांनी सविस्तर प्रकरण सांगितलं.
- गेले अनेक दिवस रामदास तडस, त्यांचा मुलगा आणि तडस कुटुंबीय तिला मारहाण करत आहेत.
- तिच्या जीवाला धोका असल्याचं तिने मला सांगितलं.
- तसंच मला इथून घेऊन चला, अशी विनवणी तिने माझ्याकडे केली आहे.
- राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी तत्काळ रवाना झाले आहेत. त्यांची सर्वोतोपरी मदत केली जाईल.
- यासंदर्भात नागपूर पोलीस आयुक्तांशी माझं बोलणं सुरु आहे. सरकार आणि पोलिसांच्यावतीने देखील तत्काळ अॅक्शन घेतली जाईल.
- झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे.
- रामदास तडस आणि कुटुंबीयांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करा.
- तडस यांना अटक करण्याची मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
खासदार रामदास तडस यांनी आरोप फेटाळले
- माझा मुलगा पंकज आणि पूजाचं लग्न झालं. लग्नाच्या सहा महिन्यानंतर दोघेही वर्ध्याला राहू लागले.
- काही काळानंतर पूजा माझ्या घरी राहायला आली.
- दरम्यानच्या काळात पंकज आणि पूजाचं भांडण झालं होतं.
- माझ्या वडिलांना न विचारता आपण लग्न केलंय. त्यावेळी आपलं असं ठरलं होतं की आपण वर्ध्याला रहायचं. मग आता तू त्यांना त्रास द्यायला त्यांच्याकडे का गेली, असं पंकजने पूजाला विचारलं.
- हे भांडणं सुरु असताना मी वर्ध्याला होतो. मला घरुन फोन येताच मी तत्काळ पोलिसांना फोन लावून घटनेची माहिती दिली.
- पोलिसांनी भांडणं सोडवली. मी देखील वर्ध्याहून घरी पोहोचलो. तोपर्यंत पंकज वर्ध्याला निघून गेला होता.
- त्यानंतर पूजा माझ्याजवळ २ महिने राहिली. पण मी एकेदिवशी तिला सांगितलं की, अशी रुसून तू इथे किती दिवस राहणार आहे, तू पंकजकडे वर्ध्याला जायला हवं.
- माझ्या बोलण्यानंतर ती वर्ध्याला न जाता तिच्या घरी गेली.
- आता याच्यात माझा कवडीचाही दोष नाहीय.
- मी तिला माझी सून मानतो… इथून पुढेही मानेन… त्या दोघांनीही आमच्या घरी यावं… राहावं… हीच माझी इच्छा आहे.