मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात सध्या सत्तासंघर्ष सुरु आहे. सत्ताधारी शिवसेनेचे ४० आमदार बंड करून आसाममध्ये तळ ठोकून आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शुभेंदू अधिकारी यांनी केलेला दावा खळबळ माजवणारा ठरला आहे. ते म्हणाले की, बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारलाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागेल आणि त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी ते पडेल. ते म्हणाले की, महाराष्ट्रानंतर बिगरभाजपा शासित झारखंड, राजस्थान ही राज्य आणि त्यानंतर बंगालचा नंबर येईल.
कूचबिहार जिल्ह्यातील एका सभेत भाजपा नेते अधिकारी म्हणाले, “प्रथम महाराष्ट्रातील परिस्थिती सुटली की यानंतर आता झारखंड आणि राजस्थानची वेळ आहे. त्यानंतर पश्चिम बंगालचीही वेळ येईल. तृणमूल काँग्रेसचीही तीच अवस्था होईल. २०२६ पर्यंत सरकार चालवता येणार नाही. हे सरकार २०२४ पर्यंत पडेल.
तृणमूल काँग्रेसकडून भाजपावर टीका
- भाजपा नेत्याच्या या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहेत.
- पक्षाने म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे हताश झालेले भाजपा सत्ता मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
- जोरदार प्रचार करूनही भाजपाला निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
- आता त्यांना कोणत्याही मार्गाने सत्ता काबीज करायची आहे. त्यांच्या या विधानांमुळे भाजपाच्या हतबलतेचा प्रत्यय येतो.