मुक्तपीठ टीम
कोरोना संकटातील आव्हाने आणि बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपाला उत्तर प्रदेशात कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे त्या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशातील सत्ता टिकवण्यासाठी आता भाजपा महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांची मदत घेणार आहे. त्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधून योगी आदित्यनाथांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदी बनवण्याचा संकल्प केल्याची माहिती भाजपा उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी दिली आहे.
भाजपाची रणनीती
- भाजपा प्रत्येक राज्यांच्या निवडणुकीच्या वेळी त्या राज्यातून बाहेर रोजगारानिमित्त गेलेले मतदार तसेच, त्या राज्यात बाहेरून येऊन स्थायिक झालेले मतदार यांची माहिती वापरत असते.
- अशा मतदारांच्या सध्याच्या वास्तव्याच्या राज्यात प्रभारी म्हणून काही नेत्यांवर जबाबदारी सोपवली जाते.
- तसेच दुसऱ्या राज्यातून आलेल्या मतदारांवर कुणाचा प्रभाव पडू शकतो अशा नेत्यांनाही निवडणुकीच्या आधीपासून प्रचारात उतरवले जाते.
भाजपाचे डेटा पॉलिटिक्स
- भाजपा महाराष्ट्रातील एकूण १.४५ कोटी उत्तर भारतीयांचा डेटाबेस तयार करत आहे.
- ते एकतर बिहारचे किंवा उत्तर प्रदेशाचे आहेत.
- महाराष्ट्र भाजपाची एक शाखा उत्तर भारतीय मोर्चाने महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्तर भारतीयांचे मॅपिंग सुरू केले आहे.
- मोर्चाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांची भेट घेतली.
गुगल फॉर्मवर भाजपा उत्तर भारतीय मोर्चा जमवतोय माहिती
- महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचा डेटाबेस तयार करण्याचे काम जोरदार सुरु आहे.
- त्यासाठी गुगुल फॉर्मचा वापर करण्यात येत आहे.
- महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात राहणाऱ्या डॉक्टर, अभियंते, उद्योगपती, व्यापारी आणि इतर व्यावसायिकांची यादी तयार केली जात आहे.
- यामध्ये महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्तर भारतीयांना त्यांचे नाव, फोन नंबर आणि पत्ता तसेच त्यांच्या मूळ जिल्ह्याचे नाव अशी सर्व माहिती असेल.