मुक्तपीठ टीम
देशातील सर्वात मोठ्या बिटकॉइन घोटाळ्यात पकडलेल्या हॅकरने दावा केला आहे की, त्याने वयाच्या ८व्या वर्षापासूनच नेटचे बारकावे शिकायला सुरुवात केली. श्रीकृष्ण रमेश नावाचा हा हॅकर सध्या कर्नाटक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. सध्या २६ वर्षे वय असलेल्या या तरुण हॅकरची आता कसून चौकशी सुरु आहे.
वय २६, घोटाळा अचंबित करणारा!
- श्री कृष्ण उर्फ श्रीकीला गेल्या वर्षी म्हणजेच १८ नोव्हेंबर २०२० रोजी पकडण्यात आले होते.
- अंमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.
- त्याने डार्क वेबवर बिटकॉइनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज विक्रेत्यांकडून अंमली पदार्थ खरेदी केले होते.
- मात्र, चौकशीदरम्यान जे काही समोर आले त्यामुळे लोक थक्क झाले. फसवणूकीतून मिळवलेल्या कोट्यवधी रुपयांपैकी त्याने एकही पैसा बचत केली नाही.
- हॉटेलिंगमध्ये दररोज लाखो रुपये खर्च केल्याचेही त्यांनी सांगितले.
- व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या श्रीकीचा अनेक ऑनलाइन गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.
महाघोटाळा करणाऱ्या या हॅकरवरील आरोप
- श्रीकी हा हॅकर्सच्या गटाचा सदस्य होता ज्यानी २ ऑगस्ट २०१६ रोजी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बिटफिनेक्स हॅक केले.
- त्यानंतर या लोकांनी तेथून सुमारे एक लाख वीस हजार बिटकॉइन चोरले.
- या बिटकॉइन्सची किंमत जवळजवळ ३.५ अब्ज रुपये इतकी होती.
- याशिवाय, कर्नाटकातील ई-गव्हर्नन्स सेंटरच्या प्रोक्योरमेंट सेलमधूनही त्याने ११.५ कोटी रुपयांची चोरी केल्याचे श्रीकीने सांगितले.
- श्रीकी मिरर साइट्स तयार करण्यात आणि बनावट पेमेंट पोर्टल तयार करून, लोकांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड तपशील चोरण्यात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यात तज्ञ होता.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने असा दावा केला आहे की, वयाच्या ८व्या वर्षापासून त्याने हे तांत्रिक बारकावे शिकायला सुरुवात केली. तो चौथीत असताना जावा, रिव्हर्स इंजिनीअरिंग शिकला होता. इतकंच नाही तर, त्याने त्याच वेळी रनस्केप हा पहिला बॉट गेमही विकसित केला. सध्या पोलीस या दाव्यांचा तपास करत आहेत.