मुक्तपीठ टीम
बावधन परिसरातील रामनदी काठी उभारण्यात येत असलेल्या कचरा विलगीकरण प्रकल्पाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात गेलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या डॉ. स्नेहल दोंदे यांनी नुकतीच रामनदीची पाहणी केली. या पाहणी वेळी डॉ. स्नेहल दोंदे यांनी रामनदीच्या पाण्याचे अनेक ठिकाणाहून नमुने घेतले.
राम नदीकाठी बांधण्यात येणाऱ्या क्षेपणभूमी व कचरा विलगीकरण प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी स्थगिती दिली आहे. या प्रकल्पामुळे नदीच्या पाण्यावर व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केलेला आहे. पुण्यातील पर्यावरण कार्यकर्ते किशोर मोहोळकर यांनी दोंदे यांना राम नदीकाठच्या या प्रकल्पाविरुद्धच्या लढ्याची माहिती दिली.
डॉ. दोंदे यांनी भुगांव व भुकूम येथील ग्रामस्थ, पर्यावरण कार्यकर्त्यांना नदीचे महत्व, सरकारी योजना तसेच नागरिकांचा नदी संवर्धनात कसा सहभाग असावा, याविषयी मार्गदर्शन केले. राम नदीचे उगमस्थळ खाटपेवाडी तलाव, भुकूम येथील सोमेश्वर मंदिरातून पुढे जाणाऱ्या रामनदीची पाहणी केली. कोथरूड येथे सद्यस्थितीतील कचरा डेपोचीही पाहणी केली करून स्थानिक नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांची भेट घेऊन, त्यांच्याशी चर्चा केली.