मुक्तपीठ टीम
येत्या १९ नोव्हेंबरला देशव्यापी बँकेचा संप आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे बँकिंग सेवा ठप्प होणार आहे. मात्र, ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमवर कोणताही परिणाम होणार नाही.
बँक ऑफ बडोदाने नियामक निवेदन जारी केले आहे की ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या सरचिटणीसांनी इंडियन बँक्स असोसिएशनला संपाची नोटीस दिली आहे. त्यात म्हटले आहे की, त्यांच्या सदस्यांनी १९ नोव्हेंबरला संपावर जाण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. १९ नोव्हेंबर हा तिसरा शनिवार असून या दिवशी बँका खुल्या राहतील.
बँक ऑफ बडोदाने निवेदनात पुढे म्हटले आहे की, परंतु, बँक संपाच्या दिवशी बँक शाखांचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. संप झाल्यास शाखा आणि कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. लग्नसराईत बँकांच्या संपामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.